प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे,मराठी सिनेसृष्टीतील एक अष्टपैलू अभिनेता जयराम कुलकर्णी काळाच्या पडद्याआड

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४-  ; अनेक मराठी चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे जयराम कुलकर्णी यांचे निधन झाले. मराठी सिनेसृष्टीतील एक अष्टपैलू अभिनेता म्हणून त्यांची ओळख होती. एकापेक्षा एक अशा मराठी चित्रपटांमध्ये त्यांनी लक्षात राहण्यासारख्या भूमिका साकारल्या.

सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील आंबेजवळगे हे जयराम कुलकर्णी यांचे मूळगाव होते. शिक्षणासाठी ते पुण्यात आले. स. प. महाविद्यालयात त्यांनी प्रवेश घेतला. तेथे श्रीकांत मोघे, शरद तळवलकर यांच्याशी मैत्री झाली. १९५६ साली आकाशवाणी पुणे केंद्रात त्यांनी नोकरी केली. सातवीत असताना त्यांनी ‘मोरूची मावशी’ नाटकात मावशीची भूमिका साकारली होती.

अनेक चित्रपटांत त्यांनी वडिलांची भूमिका साकारली होती. तर काही चित्रपटामध्ये ते वरीष्ठ पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसले. ‘माझा पती करोडपती’, ‘अशी ही बनवाबनवी’, ‘थरथराट’, ‘खट्याळ सासू नाठाळ सून’, ‘भुताचा भाऊ’, ‘दे दणादण’, ‘आयत्या घरात घरोबा’, ‘धुमधडाका’, ‘झपाटलेला’ अशा अनेक चित्रपटांमधील त्यांच्या भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरल्या. अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे, महेश कोठारे अशा दिग्गज कलाकारांसोबत त्यांनी अनेक चित्रपटात काम केले.

दिग्दर्शक अनंतराव माने यांनी जयराम यांना पहिल्यांदा चित्रपटात संधी दिली. कोल्हापूर आणि मुंबई येथे चित्रीकरण करताना त्यांना अभिनय आणि नोकरी सांभाळताना तारेवरची कसरत करावी लागायची. तरीही त्यांनी आपली अभिनयाची आवड जोपासली. सुरूवातीला सरपंच, पाटील अशा ग्रामीण भूमिका जयराम यांनी चित्रपटांतून साकारल्या. परंतु नंतर ‘गंमत जंमत’, ‘दे दणादण’, ‘नवरी मिळे नवऱ्याला’, ‘झपाटलेला’, ‘बाळाचे बाप ब्रह्मचारी’ अशा अनेक चित्रपटांत त्यांनी विविध भूमिका साकारल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *