महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .२२ डिसेंबर । दहावी-बारावीच्या बोर्डाच्या परीक्षेत (SSC HSC Board Exam) दरवर्षी तीन तासांचा असणारा पेपर यंदा साडे तीन तासांचा असणार आहे. होय, यंदा विद्यार्थ्यांना पेपर लिहिण्यासाठी अर्धा तास (Extra Hour) वाढवून मिळणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ऑनलाइन शिक्षणामुळे विद्यार्थ्यांची (Students) लिखाणाची सवय मोडली असण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने यंदाच्या दहावी-बारावीच्या लेखी परीक्षेसाठी (Written Exam) अर्धा तास वाढवून दिला आहे.
दहावी-बारावीच्या परीक्षेत ७० आणि त्यापेक्षा अधिक गुणांच्या पेपरसाठी ३० मिनिटे, तर ७० पेक्षा कमी गुणांच्या पेपरसाठी १५ मिनिटे वाढवून मिळणार असल्याचे मंडळाने स्पष्ट केले आहे. मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी म्हणाले,‘‘ शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये कोरोना काळात ऑनलाइनद्वारे शिक्षण देण्यात येत होते. परिणामी विद्यार्थ्यांचा लिखाणाचा सराव कमी झाला आहे. हे लक्षात घेऊन, राज्य मंडळाने यंदाच्या परीक्षेत विद्यार्थ्यांना पेपर सोडविण्यासाठी वेळ वाढवून देण्याचा निर्णय घेतला आहे. त्याप्रमाणे ७०, ८० आणि १०० गुणांच्या पेपरसाठी अर्धा तास वाढवून दिला जाणार आहे. तर ४०, ५० आणि ६० गुणांच्या पेपरसाठी १५ मिनिटे वाढवून देण्यात येणार आहेत.
त्यामुळे परीक्षेदरम्यानचे सकाळच्या सत्रातील पेपर दरवर्षी अकरा वाजता सुरू होतो. त्यात ७० आणि त्यापेक्षा जास्त गुण असणाऱ्या पेपर सकाळी साडे दहा वाजता सुरू होणार आहे. दुपारच्या सत्रातही त्या-त्या पेपरच्या गुणांनुसार वेळ वाढवून दिली जाणार आहे.’’
विद्यार्थ्यांनी वेळापत्रकात दिलेल्या नियोजित वेळेपूर्वी किमान अर्धा तास आधी परीक्षा केंद्रावर उपस्थित राहणे आवश्यक असल्याचेही गोसावी यांनी नमूद केले आहे.