![]()
महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .२२ डिसेंबर । आयकर रिटर्न भरण्याची शेवटची तारीख जवळ येत आहे. त्याचवेळी आयकर रिटर्न भरण्याची मुदत पुन्हा एकदा वाढू शकते, असे काही तज्ज्ञांचे मत आहे. याआधी ही मुदत दोन वेळा वाढविण्यात आली आहे. पहिल्यांदा ३१ जुलै ते ३० सप्टेंबरपर्यंत मुदत वाढ करण्यात आली आणि त्यानंतर ३१ डिसेंबरपर्यंत ती वाढविण्यात आली. काही तज्ज्ञांचे मत आहे की, ओमिक्रॉनच्या वाढत्या प्रकरणांमुळे आयकर रिटर्न भरण्याची अंतिम तारीख पुन्हा एकदा वाढवली जाऊ शकते. दुसरीकडे, आयकर रिटर्नमध्ये पुन्हा एकदा वाढ होण्याची शक्यता असल्याचेही एका सरकारी अधिकाऱ्याने सांगितले आहे.
सीएनबीसी-टीव्ही १८ (CNBC-TV18) शी बोलताना आयकर विभागाच्या अधिकाऱ्याने सांगितले की, आयटी रिटर्न भरण्याची तारीख ३१ डिसेंबरच्या पुढे वाढवण्याचा विचार केला जाऊ शकतो. विविध करदात्यांनी नवीन आयकर पोर्टलच्या तांत्रिक त्रुटींबद्दल चिंता व्यक्त केली आहे, त्यामुळे आयकर रिटर्नची अंतिम तारीख वाढू शकते. अधिकाऱ्याने असेही सांगितले की, आयटीआर दाखल करण्याची मुदत वाढवणे हा धोरणात्मक निर्णय आहे, जो केंद्रीय अर्थमंत्री घेतील.
३.८३ कोटींहून अधिक रिटर्न भरले
प्राप्तिकर विभागाने दिलेल्या माहितीनुसार, २०२०-२१ या आर्थिक वर्षासाठी १९ डिसेंबरपर्यंत ३.८३ कोटीहून अधिक कर रिटर्न भरले गेले आहेत. आयकर विभागाकडून असेही सांगण्यात आले आहे की, जर तुम्हालाही प्राप्तिकर रिटर्न भरायचा असेल, तर तो त्वरित भरा.
प्राप्तिकर विभागाकडून करदात्यांना संदेश पाठवला जात आहे. ज्यावर लिहिले आहे की, “प्रिय पॅन नंबर, एवाय २०२१-२२ (AY 2021-22) साठी प्राप्तिकर रिटर्न भरण्याची ही चांगली वेळ आहे. त्यामुळे आत्ताच भरा आणि जर तुम्ही हा कर भरला असेल, तर या संदेशाकडे दुर्लक्ष करा.”
अंतिम तारखेनंतर दंड आकारला जाणार
आयटीआर भरण्याची अंतिम मुदत ३१ डिसेंबरपर्यंत निश्चित करण्यात आली आहे, हे करदात्यांनी लक्षात ठेवावे. जर या काळात तुम्ही रिटर्न भरले नाही आणि टॅक्स रिटर्न भरण्याची शेवटची तारीख बदलली नाही, तर तुम्हाला दंडासह आयटीआर (ITR) भरावा लागेल.