ICC Test Rankings : Marvelous लाबुशेन ! स्मिथचा बदली खेळाडू म्हणून संघात आला अन् बनला १ नंबरी फलंदाज !

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .२२ डिसेंबर । आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने ताजी कसोटी क्रमवारी जाहीर केली आहे. ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाचा स्टार फलंदाज मार्नस लाबुशेनला या क्रमवारीत सर्वाधिक फायदा झाला आहे. त्याने इंग्लिश कर्णधार जो रूटला मागे टाकत अव्वल क्रमांक पटकावला आहे.. त्याचबरोबर गोलंदाजीत ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कने अव्वल गोलंदाजांच्या कसोटी क्रमवारीत नवव्या स्थानावर झेप घेतली आहे.

ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यात खेळल्या जाणार्‍या अ‍ॅशेस मालिकेत मार्नस लाबुशेन आपल्या संघासाठी सातत्याने धावा करत आहे. त्याने आतापर्यंत खेळलेल्या २ सामन्यांमध्ये ७६ च्या प्रभावी सरासरीने २२८ धावा केल्या आहेत. तो सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे. या फलंदाजीचे फळ त्याला आयसीसीच्या ताज्या कसोटी क्रमवारीत मिळाले आहे.

लाबुशेनचे ९१२ रेटिंग गुण आहेत, तर रुट ८९७ गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. स्टीव्ह स्मिथ (८८४) तिसऱ्या स्थानावर, केन विल्यमसन (८७९) चौथ्या स्थानावर आणि रोहित शर्मा (७७५) पाचव्या स्थानावर आहे. त्याचबरोबर भारतीय कर्णधार विराट कोहली एका स्थानाने खाली घसरला आहे. तो आता ७५६ रेटिंग गुणांसह सातव्या स्थानावर आहे.

दुसरीकडे, गोलंदाजीतही वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कने टॉप-१० कसोटी गोलंदाजांच्या यादीत 4 स्थानांची झेप घेतली आहे. स्टार्क ७६८ रेटिंग गुणांसह नवव्या स्थानावर पोहोचला आहे. पॅट कमिन्स (९०४) अजूनही अव्वल स्थानावर आहे. दुसऱ्या स्थानावर भारताचा दिग्गज फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विन (८८३) आहे. न्यूझीलंडचा टिम साऊदीही ८१४ रेटिंग गुणांसह चौथ्या स्थानावर आहे.

२०१९च्या अ‍ॅशेस मालिकेत ऑस्ट्रेलियाचा दिग्गज फलंदाज स्टीव्ह स्मिथला दुखापत झाली. इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चरचा बॉल स्मिथच्या डोक्यावर जाऊन आदळला. त्यावेळी स्मिथला कंकशन सब्स्टिट्यूट म्हणून लाबुशेनला संघात सामील करण्यात आले. गुणवत्तेने परिपूर्ण असा लाबुशेन त्या घटनेपासून ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजीचा विभागाचा आधार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *