महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .२३ डिसेंबर । उत्तर भारतात थंडीची लाट (Cold wave) ओसरल्यानंतर महाराष्ट्रात देखील किमान तापमानात वाढ (Temperature in maharashtra) झाली आहे. परिणामी राज्यात अनेक ठिकाणी किंचित गारवा कमी झाला आहे. येत्या तीन दिवसात राज्यात अनेक ठिकाणी किमान तापमानात 2 ते 4 अंशाची वाढ होण्याची शक्यता हवामान खात्याकडून (IMD) वर्तवण्यात आली आहे. खरंतर अशा प्रकारची थंडी रब्बी पिकांसाठी अत्यंत पोषक ठरते. पण उत्तरेकडील हवामान बदलामुळे राज्यातील थंडीची लाट ओसरली आहे.
जळगाव आणि सोलापूर वगळता राज्यात अनेक ठिकाणी सरासरीच्या तुलनेत किमान तापमान वाढलं आहे. गेल्या तीन ते चार दिवसांपासून उत्तर आणि वायव्य भारतात तीव्र थंडीची लाट (Severe cold wave) आली होता. याचा परिणाम म्हणून महाराष्ट्रातील किमान तापमानात मोठी घट झाली होती. विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्र बहुतांशी ठिकाणी तापमानाचा पारा 10 अंशाच्या खाली गेला होता. तर उर्ववरित महाराष्ट्रातलं किमान तापमान 10 ते 18 अंश सेल्सिअस दरम्यान नोंदलं होतं.
पण आता येत्या तीन दिवसांत राज्यातील किमान तापमानात हळूहळू वाढ होण्याची शक्यता आहे. असं असलं तरी बहुतांशी ठिकाणचं कमाल तापमान 30 अंश सेल्सिअसच्या खालीच राहणार आहे. त्यामुळे किमान तापमानात वाढ झाली तरी गारठ्यात फारसा फरक पडणार नसल्याची माहिती हवामान तज्ज्ञांकडून देण्यात आली आहे.
आज सकाळी पुण्यातील शिरूर याठिकाणी सर्वात कमी 10.2 अंश सेल्सिअस तापमानाची (temperature in pune) नोंद झाली आहे. यासोबतच हवेली (11.6), पाषाण (12.1), एनडीए (12.6), आंबेगाव (12.6), इंदापूर (12.7), माळीण (12.7) आणि शिवाजीनगर याठिकाणी 12.8 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली आहे. पुणे जिल्ह्यातील उर्वरित ठिकाणी 13 ते 18 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली आहे. याशिवाय मुंबईत देखील यंदाच्या हंगामातील सर्वात कमी तापमानांची नोंद झाली आहे. सांताक्रूझ आणि कुलाबा याठिकाणी अनुक्रमे 17.9 आणि 19.4 अंश सेल्सिस तापमान नोंदलं गेलं आहे.