यंदाही थर्टी फर्स्ट घरातच? हॉटेल व्यावसायिकांची वाढली चिंता

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .२३ डिसेंबर । कोरोनामुक्तीकडे वाटचाल सुरू असताना कोरोनाच्या ओमायक्रॉन या नव्या व्हेरियंटने पुन्हा एकदा जगभर दहशत निर्माण केली आहे. त्यामुळे सरकार आणि आरोग्य तज्ज्ञांकडून चिंता व्यक्त केली जात असून खबरदारीचे आवाहन केले जात आहे. परिणामी थर्टी फर्स्टच्या सेलिब्रेशनबाबत हॉटेलचालकांची चिंता वाढली आहे.

सरत्या वर्षाला निरोप आणि नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी आबालवृद्ध सज्ज झाले आहेत. सर्वत्र थर्टी फर्स्टच्या सेलिब्रेशनचे नियोजन सुरू आहे. त्यातच मागील वर्षी कोरोनाच्या संकटामुळे सेलिब्रेशनवर निर्बंध घालण्यात आले होते. त्यामुळे नागरिकांना नाईलाजाने घरीच सेलिब्रेशन करावे लागले. यंदा कोरोनाची रुग्णसंख्या कमी झाल्याने नववर्षाचे स्वागत जल्लोषात होईल, अशी अपेक्षा असताना कोरोनाच्या ओमायक्रॉन या नव्या व्हेरियंटने डोके वर काढले आहे. जगभरात ओमायक्रॉनची दहशत पसरल्याने नववर्ष स्वागतावर यंदाही निर्बंध येतील की काय? अशी चिंता व्यक्त केली जात आहे. त्यातच प्रशासनाने अद्याप नियमावली जाहीर केलेली नाही.

थर्टी फर्स्टसाठी मागील वर्षी रात्री दहापर्यंत वेळ देण्यात आली होती. तसेच जमावबंदीचे आदेश होते. मात्र, यंदाची नियमावली अद्याप जाहीर झालेली नसून व्यावसायिकांचे त्याकडे लक्ष लागले आहे. येत्या दोन-तीन दिवसात नियमावली जाहीर होण्याची शक्यता आहे.

थर्टी फर्स्ट सेलिब्रेशनसाठी शहरातील नामांकित हॉटेल आणि रेस्टॉरंटमध्ये बुकिंग सुरू आहे. याशिवाय इतर छोट्या-मोठ्या हॉटेलमध्ये देखील मोठी गर्दी होत असते. त्यामुळे या एका दिवसात कोट्यवधींची उलाढाल होते. मात्र, प्रशासनाने सेलिब्रेशनवर निर्बंध लादल्यास या उलाढालीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ शकते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *