महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .२४ डिसेंबर । नाशिककरांसाठी एक अतिशय आनंदाची बातमी. त्यांना आता अवघ्या 2 तासांमध्ये चक्क दिल्ली गाठता येणे शक्य होणार आहे. शिवाय गोवा त्यापेक्षाही कमी वेळेत गाठता येईल. होय, आता नाशिकहून चक्क या दोन शहरांसाठी विमानसेवा सुरू होणार आहे. त्यासाठी स्पाईस जेटने पुढाकार घेतला आहे. विशेष म्हणजे ही गोड बातमी केंद्रीय नागरी हवाई वाहतूकमंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या पत्रातून समोर आलीय. त्यामुळे पर्यटन आणि उद्योगाच्या राजधानीला अजून बरकत येणार आहे, यात नक्कीच संशय नाही.
नाशिक-दिल्ली मार्गावर यापूर्वी जेट एअरवेजची सेवा सुरू होती. तिला फुल्ल प्रतिसाद मिळायचा. मात्र, कोरोना आला. अनेक कंपन्यांवर आर्थिक संकटे कोसळली. त्यामुळे आपसुकच ही सेवा बंद पडली. त्यामुळे उडान योजनेत बोली जिंकूनही सेवा सुरू न केलेल्या कंपन्यांना येथे सेवा सुरू करायला लावावी, अशी गळ स्थानिक उद्योजक आणि आयमा एव्हिएशन कमिटीचे चेअरमन मनीष रावल आणि सहकाऱ्यांनी पालकमंत्री छगन भुजबळ यांना घातली. त्यांनी केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांच्याकडे पाठपुरावा केला. पत्र लिहिले. त्यानंतर सिंधिया यांनी स्पाईस जेटकडून नाशिकहून दिल्ली आणि गोवा येथे जानेवारीत सेवा सुरू होणार असल्याची माहिती भुजबळांना दिली.
जेट एअरवेजची नाशिक-दिल्ली विमानसेवा बंद पडली होती. त्यामुळे दुसऱ्या कंपनीने नाशिक-दिल्ली विमान सुरू करावे, यासाठी यासाठी प्रयत्न करण्यात आले होते. त्यानंतर उडाण योजनेंतर्गत इंडिगो कंपनीला नाशिक-दिल्ली विमान सेवा सुरू करण्यात परवानगी मिळाली. येत्या 25 सप्टेंबरपासून ही सेवा सुरू होणार होती. मात्र, दिल्ली विमानतळावर विमान उतरण्यासाठी आणि उड्डानासाठी कंपनीला वेळ मिळाली नव्हती. हा वेळ मिळाला तर इंडिगोचीही सेवा नंतर सुरू होऊ शकते. दरम्यान, आता लवकर स्पाईस जेट लवकरच आपले वेळापत्रक जाहीर करणार असल्याचे समजते.
28 विमानांच्या फेऱ्या…
खरे तर नाशिककरांनी दिल्लीच्या विमान सेवेला उदंड प्रतिसाद दिला होता. पुणे, बेळगाव, अहमदाबादपेक्षाही या विमानात प्रवासी संख्या जास्त होती. नाशिक येथील विमानतळावरून सध्या आठवड्यातून 28 विमानांच्या फेऱ्या होतात. त्यात पुणे, बेळगाव, अहमदाबाद, हैदराबाद या शहरांसाठी विमानसेवा सुरू आहे. येणाऱ्या काळात येथून अनेक शहरांसाठी विमानसेवा सुरू होण्याची शक्यता आहे. मात्र, त्यासाठी तूर्तास काही काळ वाट पहावी लागेल.