महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .२५ डिसेंबर । भारताचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांची आज जयंती आहे. त्यानिमित्ताने प्रत्येक वर्षी भारतात ‘गुड गवर्नेंस डे’ अर्थात सुशासन दिन साजरा करण्यात येतो. अटल बिहारी वाजपेयी यांच्या स्मृती निमित्ताने हा दिन साजरा करण्यात येतो. अटल बिहारी वाजपेयी एक प्रतिभासंपन्न असे व्यक्तिमत्व होते. त्यांनी भारताचे नाव अनेक क्षेत्रात मोठे केले.
2014 साली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अटल बिहारी वाजपेयी यांच्या सन्मानार्थ प्रत्येक वर्षी 25 डिसेंबर रोजी ‘गुड गवर्नेंस डे’ साजरा करण्याची घोषणा केली होती. त्यापार्श्वभूमीवर आज देखील देशात गवर्नेंस डे साजरा करण्यात येत असून, अटलबिहारी वाजपेयींना देशभरात अभिवादन केले जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक नेत्यांनी अटल बिहारी वाजपेयी यांना आदरांजली दिली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी 2014 मध्ये सत्तेत आल्यानंतर त्यांनी 25 डिसेंबर हा दिवस सुशासन दिन म्हणून साजरा केला जाईल, अशी घोषणा केली होती. माजी पंतप्रधान बिहारी यांना कामातून श्रद्धांजली अर्पण केली जावी. या दिवशी त्यांच्या कार्याची आठवण केली जाते. तसेच विविध कार्यक्रमांचे देखील आयोजन करण्यात येते. त्या माध्यमातून अटल बिहारी वाजपेयी यांच्या व्यक्तित्व आणि कृतित्वाचा परिचय करुन दिला जातो.
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अटल बिहारी वाजपेयी यांना आदरांजली दिली आहे. मोदींनी ट्विट करत म्हटले आहे की, माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचा जयंतीनिमित्त त्यांना कोटी-कोटी नमन. अटलजींच्या जयंतीनिमित्त त्यांचे स्मरण. त्यांनी देशासाठी केलेल्या भरीव सेवेने आम्ही प्रेरित झालो आहोत. भारताला मजबूत आणि विकसित करण्यासाठी त्यांनी आपले जीवन समर्पित केले. त्यांच्या विकासाच्या उपक्रमांचा लाखो भारतीयांवर सकारात्मक परिणाम झाला. असे म्हणत मोदींनी अटल वाजपेयी यांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे.
माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचा जन्म 25 डिसेंबर 1924 साली मध्यप्रदेशातील ग्वाल्हेरमध्ये झाला. ते तीन वेळा भारताचे पंतप्रधान राहिले आहेत. 1996 साली पहिल्यांदा तर 1998-99 मध्ये दुसऱ्यांदा पंतप्रधान झाले. तर 13 ऑक्टोबर 1999 ला तिसऱ्यांदा ते पंतप्रधान झाले. अटल बिहारी वाजपेयी हे संयुक्त राष्ट्र संघामध्ये हिंदीत भाषण देणारे पहिले नेते होते. त्यांचं हिंदीवर खूप प्रेम होते. 27 मार्च 2015 ला त्यांना ‘भारत रत्न’ पुरस्कार देखील देण्यात आला होता.