महाराष्ट्र २४ ऑनलाईन : मुंबई – ‘‘जगभर थैमान घातलेल्या कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारकडून शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. सध्या सरकारी कार्यालये सुरूच आहेत. सार्वजनिक वाहतूक सेवा म्हणजे रेल्वे आणि बेस्ट सेवा सुरू आहे. मात्र, आवश्यकता वाटली तर पुढील काळात सरकारी कार्यालये तसेच सार्वजनिक सेवा नाइलाजाने बंद कराव्या लागतील. राज्यातील जनतेने सहकार्य करावे,’’ असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले.
राज्यातील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी सह्याद्री येथे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मंत्रिमंडळाची बैठक बोलाविण्यात आली होती. या बैठकीनंतर मुख्यमंत्री ठाकरे, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी माध्यमांना माहिती दिली. मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, ‘‘सरकारी कार्यालये बंद करावीत का? याबाबत विचार सुरू आहे. मात्र, सध्या सरकारी कार्यालये बंद करण्याचा विचार नाही. तसेच बस अथवा रेल्वेसेवा बंद केल्या जाणार नाहीत. मात्र, जनतेने सहकार्य करावे. गरज असेल तरच घराबाहेर पडावे. जनतेने सहकार्य केले नाही, तर आम्हाला नाइलाजाने निर्णय घ्यावा लागेल.’’
‘‘जनतेने स्वतःची काळजी घ्यावी. धार्मिक स्थळांची गर्दी कमी करावी. धार्मिक स्थळांच्या प्रमुखांनी याची खबरदारी घ्यावी,’’ असे आवाहनही ठाकरे यांनी केले.
मुख्यमंत्री म्हणाले, ‘‘पुढील १५-२० दिवस महत्त्वाचे आहेत. त्यामुळे खासगी तसेच सरकारी आस्थापनावरील अधिकारी व कर्मचारी यांची उपस्थिती कमी करता येईल का? याबाबत विचार सुरू आहे. तसेच, अत्यावश्यक सेवा वगळता इतर ठिकाणची कार्यालये, खासगी दुकाने यांनी सहकार्य करावे. शक्यतो बंद ठेवावा.’’
कोरोनाचे टेस्ट किट केंद्र सरकार देते. केंद्राची याबाबत मार्गदर्शक तत्त्वे आहेत. त्यानुसार आपणास खासगी रुग्णालयात या चाचण्यांची सुविधा करता येत नाही. असे असले तरीही चाचण्यांसाठी किट कमी पडणार नाहीत, याची खबरदारी राज्य सरकारकडून घेतली जात आहे, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले.
कुणाच्याही तोंडावर मास्क नाही
सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या पत्रकार परिषदेच्या वेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आरोग्यमंत्री टोपे यांच्यासह मोठ्या संख्येने प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते. याचबरोबर मोठ्या संख्येने प्रिंट तसेच इलेक्ट्रॉनिक माध्यमांचे पत्रकार मुख्यमंत्र्यांसह अधिकाऱ्यांना गराडा टाकून प्रश्न विचारत होते. यापैकी कोणाच्याही तोंडावर मास्क नव्हते. त्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.