महाराष्ट्र २४ ऑनलाईन : सध्या डिप्रेशन म्हणजेच नैराश्य या मानसिक विकाराच्या विळख्यात अनेक लोक अडकत आहेत. विशिष्ट आहार अशा मानसिक स्थितीला टाळण्यासाठी मदत करू शकतो. अशा आहाराची ही माहिती…
कॅमोमाईल : या चहामध्ये सुजरोधक, जीवाणुरोधक तसेच अँटिऑक्सिडंट व आराम देणारे गुण असतात. कॅमोमाईलमधील फ्लेवोनॉईडस्मुळे त्यामध्ये नैराश्य कमी करण्याची शक्ती असते. कॅमोमाईल चिंतेच्या लक्षणांना कमी करतात.
दही : दह्यात लॅक्टोबेसिलस आणि बिफिडोबॅक्टिरिया नावाचे आरोग्यदायी जीवाणू असतात. हे दोन्ही प्रकारचे जीवाणू मेंदूवर सकारात्मक प्रभाव टाकतात. रोज दह्याचे सेवन केल्याने चिंता, नैराश्य आणि तणावाला कमी केले जाऊ शकते.
ग्रीन टी : या चहामध्ये थायमिन नावाचे अमिनो अॅसिड असते ज्यामध्ये मनःस्थितीशी निगडित विकारांना बरे करण्याची क्षमता असते. थायमिनमध्ये नैराश्यरोधक आणि मेंदूला आराम देणारे गुण असतात. ते सेरोटोनिन आणि डोपामाईनचा स्त्रावही वाढवून नैराश्य दूर ठेवण्यास मदत करते.
एवोकॅडो : मूड चांगला करणार्या सेरोटोनिनचे प्रमाण एवोकॅडो या फळाच्या सेवनानेही वाढवता येऊ शकते. त्यामध्ये ‘ब’ जीवनसत्त्वाशिवाय थायमिन, रायबोफ्लेविन आणि नियासिन असते जे चेतासंस्थेवर सकारात्मक परिणाम करते. याच घटकांच्या कमतरतेमुळे काही लोकांमध्ये चिंतेची समस्या असते.
भोपळ्याच्या बिया : यामध्ये पोटॅशियम मोठ्या प्रमाणात असते जे शरीरात इलेक्ट्रोलाईट संतुलित करण्यासाठी आणि रक्तदाब नियंत्रित करण्यासाठी मदत करते. तणाव आणि चिंतेचे लक्षण कमी करण्यातही ते उपयुक्त आहे. यामध्ये झिंक हे खनिजही असते जे मूड चांगला ठेवते.
मासे : जर आपण मांसाहारी असाल तर डिप्रेशनपासून बचाव करण्यासाठी मत्स्याहार करणे हितावह ठरते. यामध्ये ‘ओमेगा-3’ फॅटी अॅसिड असते जे मेंदूच्या पेशींमध्ये परस्परसंबंध सुधारण्यासाठी मदत करते. या फॅटी अॅसिडमुळे सेरोटोनिनच्या स्रावातही सुधारणा होऊन मूड चांगला राहतो.
सुका मेवा : काजू, अक्रोड यासारख्या सुक्या मेव्यात मेंदूचे आरोग्य चांगले ठेवण्याचे गुण असतात. विशेषतः अक्रोड या बाबतीत अधिक उपयुक्त आहे. यामध्ये वनस्पतींमधून मिळणारे ‘ओमेगा-3’ मोठ्या प्रमाणात असते. ते प्रोटिनचाही उत्तम स्रोत आहे. त्यामुळे रक्तातील साखरही नियंत्रित राहते.
अंडी : अंड्यांमध्ये ‘ड’ जीवनसत्त्व मोठ्या प्रमाणात असते. त्यामध्ये प्रोटिनही असते व त्यामुळे शरीराला आवश्यक असे सर्व अमिनो अॅसिड मिळतात. अंड्यामध्ये ट्रिप्टोफेन नावाचे अमिनो अॅसिड असते जे सेरोटोनिन बनवण्यासाठी मदत करते. त्याच्यामुळे मेंदूचे कार्य सुधारते आणि चिंता दूर ठेवण्यास मदत मिळते.
हळद : हळदीत करक्युमिन नावाचा घटक असतो जो सूज आणि ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस कमी करून चिंता घटवतो. मूड म्हणजेच मनःस्थिती सुधारण्यासाठी हळद उपयुक्त ठरते.