रुग्णसंख्या वाढतेय, दोन दिवसांत मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करुन निर्बंधांबाबत निर्णय घेणार; राजेश टोपेंची माहिती

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .२९ डिसेंबर । राज्यात गेल्या ७ दिवसांत कोरोना रुग्णसंख्येत वेगानं वाढ होत असल्याचं आकडेवारीवरुन दिसून येत आहे आणि ही चिंताजनक बाब असल्याचं राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटलं आहे. राज्यातील सक्रीय रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्यामुळे आपल्याला आता अधिक काळजी घेण्याची आणि कदाचित निर्बंध अधिक कडक करण्याची गरज पडू शकते. याबाबत येत्या दोन दिवसांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करुन पुढील निर्णय घेण्यात येईल, असं राजेश टोपे म्हणाले. ते मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते.

राज्यातील वाढत्या कोरोना रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर राजेश टोपे यांनी आज प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी टोपे यांनी कोरोना रुग्णवाढीची आकडेवारीची माहिती देत राज्यात हळूहळू चिंताजनक वातावरण निर्माण होत असल्याची जाणीव करुन दिली. नागरिकांनी आता गाफील राहू नये. गेल्या सात दिवसांत रुग्णवाढीचा दर झपाट्यानं वाढताना दिसतोय, असं राजेश टोपे म्हणाले.

मुंबईत रुग्णांच्या पॉझिटिव्हिटी रेट आता ४ टक्क्यांवर गेला आहे आणि ही आकडेवारी धोकादायक आहे. २० जानेवारी रोजी मुंबईत दिवसाला ३०० रुग्ण आढळून येत होते. पण आता आकडा १ हजारावर पोहोचला आहे. आज मुंबईत १३०० रुग्ण आढळून आल्याची माहिती समोर आली आहे. आज संध्याकाळी संपूर्ण आकडेवारी आल्यानंतर हा आकडे अंदाजे २२०० वर पोहोचेल, त्यामुळे ही अत्यंत चिंताजनक बाब आहे, असं राजेश टोपे म्हणाले.

मुख्यमंत्र्यांशी बोलून निर्बंधांबाबत निर्णय घेणार
राज्यातील कोरोना रुग्णवाढीची माहिती मुख्यमंत्र्यांना भेटून देणार आहे. त्यानंतर सविस्तर चर्चा करुन निर्बंधांमध्ये काही वाढ करण्याबाबतचा निर्णय घेतला जाईल. कारण सध्याची रुग्णवाढ पाहता निर्बंधांमध्ये वाढ होण्याची दाट शक्यता आहे. नागरिकांनी आता सतर्क राहून जास्त गर्दी होईल अशा ठिकाणी जमणं टाळायला हवं. लग्नसमारंभ आणि इतर सोहळ्यांमध्ये गर्दी करू नये, असं आवाहन देखील राजेश टोपे यांनी केलं आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *