फडणवीसांसोबत सरकार बनवण्यासाठी तुम्हीच अजित पवारांना पाठवलं होतं का? शरद पवारांची पहिल्यांदाच थेट प्रतिक्रिया

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .३० डिसेंबर । अवघा महाराष्ट्र साखरझोपेत असताना 23 नोव्हेंबर 2019 रोजी राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप झाला. राजभवनात माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि विद्यमान उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा शपथविधी पार पडला. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री तर अजित पवार यांना उपमुख्यमंत्रीपदाची शपथ दिली. पण फडणवीस आणि अजितदादांची खेळी फार काळ टिकाव धरू शकली नाही, हे उभा महाराष्ट्र जाणतोच. अनेक जण विरोधकांना कात्रजचा घाट दाखवण्यासाठी ही खेळी शरद पवारांनी खेळल्याचे म्हणतात. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि खासदार शरद पवार यांनी पहिल्यांदाच थेट प्रतिक्रिया दिलीय.

पवार म्हणाले की…

शरद पवार यांची मुलाखत ज्येष्ठ पत्रकार आणि लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर यांनी घेतली. यावेळी त्यांनी अवघ्या देशाला कोड्यात टाकणाऱ्या त्या पहाटेच्या शपथविधीबाबत प्रश्न विचारला. त्यावेळी मिश्किल हसत पवारांनी सडेतोड उत्तर दिले. पवार म्हणाले की, देवेंद्र फडणवीसांसोबतच्या शपथविधीसाठी अजित पवारांना मी पाठवलं असं म्हणतात हे खरं आहे. पण मी पाठवलं असतं, तर तिथे राज्यच बनवलं असतं. असं अर्धवट काही काम केलं नसतं. याच्यात काहीही अर्थ नाही. त्यात दुसऱ्या काही गोष्टी आहेत, असा सूचक उल्लेख पवारांनी यावेळी केला. मात्र, त्यात दुसऱ्या गोष्टी कोणत्या होत्या, हे काही त्यांनी सांगितलं नाही.

पंतप्रधानांशी चर्चा झाली…

शरद पवार याप्रश्नाबाबत पुढे असेही म्हणाले की, ही गोष्ट सत्य आहे, की माझी आणि पंतप्रधानांची चर्चा झाली होती. त्यांची इच्छा होती की, आम्ही एकत्र यावं. पण मी स्वतः जाऊन त्यांना सांगितलं की, हे शक्य होणार नाही. तुम्हाला अंधारात ठेवायचं नाही. आमची भूमिका ही वेगळी आहे. हे मी त्यांच्या ऑफिसमध्ये जाऊन सांगितलं, असा उल्लेखही पवारांनी यावेळी केला. मात्र, ही ऑफर का आली, याचा खुलासाही त्यांनी यावेळी केला.

हे त्यांच्या मनात…

शरद पवार पुढे म्हणाले की, त्यांच्याकडून माझ्या निर्णयावर अजूनही विचार करावा, असं सांगितलं केलं. त्यांनी तशी गळही घातली. त्या वेळला हे वेगळेच झाले होते. निवडणूक झाल्याच्यानंतर जवळपास दीड महिने इथं सरकार बनलं नव्हतं. अन् त्यामुळे साहजिकच तिथं अंतर वाढत गेलं होतं. अन् त्यामुळे त्यांना कदाचित असं वाटत असेल की, महाराष्ट्रासारख्या राज्यात एक स्टेबल गव्हर्मेंट हवं असेल, तर असं केलं तर कदाचित होऊ शकेल. हे त्यांच्या मनात असावं. त्यामुळंच त्यांनी आपल्याला ऑफर दिली असावी, अशी शक्यताही त्यांनी व्यक्त केली.

साडेतीन दिवसांचं कोडं…

23 नोव्हेंबर 2019 रोजीची सकाळ अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्या पहाटे-पहाटे राजभवनात झालेल्या शपथविधीने उजाडली. देवेंद्र फडणवीसांनी अजित पवारांच्या पाठिंब्यावर सरकार स्थापनेचा दावा केला होता. त्यासाठी भल्या पहाटे राजभवनावर जाऊन दोघांनी अनुक्रमे मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री पदाच्या शपथा घेतल्या. भाजपला 39-40 आमदार कमी पडत होते. मात्र, ज्या आमदारांच्या भरोशावर अजित पवारांनी हे धाडस केलं, शेवटी त्या आमदारांनी त्यांची साथ सोडली आणि साडेतीन दिवसांत हे सरकार पडलं. याचं कोडं आज शरद पवारांनी काहीसं उलगडं असलं तरी या चर्चा अजून सुरूच राहतील, यात शंका नाही.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *