नशीबवान ! चुकून दाबलं बटण पण लागली 37 लाखांची लॉटरी, महिला झाली मालामाल

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .३१ डिसेंबर । आपण श्रीमंत व्हावं, रातोरात भरपूर पैसे मिळावेत अशी अनेकांची इच्छा असते. अशीच एक घटना आता समोर आली आहे. चुकून भलतंच बटण दाबलं अन् एका महिलेचं नशीब आता फळफळलं आहे. तिला तब्बल 37 लाखांची लॉटरी लागली आहे. लॉटरी वेंडिंग मशिन (Lottery Vending Machine) वापरताना चुकून बटण दाबलं गेलं आणि महिलेचं नशीबच बदललं आहे. महिलेला चक्क 50 हजार डॉलर्स म्हणजेच भारतीय चलनात 37 लाख 31 हजार 710 रुपयांची लॉटरी (Lottery Prize) लागली आहे.

‘ग्लोबल टाइम्स’मध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, मेरीलँडमध्ये (Maryland) राहणाऱ्या एका 43 वर्षीय महिलेसोबत ही घटना घडली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, ही महिला हॅगरस्टाउनमधल्या हाफवे लिकर्समध्ये (Halfway Liquors) लॉटरी वेंडिंग मशीनजवळ उभी होती. यादरम्यान चुकून महिलेच्या हातून लॉटरी मशीनचं बटण दाबलं गेलं. बटन दाबताच मशीनमधून 20 डॉलर स्क्रॅच-ऑफ गेमऐवजी 5 डॉलरचं डिलक्स क्रॉसवर्ड म्हणजे 50 हजार डॉलर्स लॉटरीचं तिकीट बाहेर आलं.

50 हजार डॉलर्सची लागली लॉटरी

तिकीट पाहिल्यानंतर आपल्याला 50 हजार डॉलर्सची लॉटरी लागली आहे, हे महिलेच्या लक्षातच आलं नाही. हवं असलेलं तिकीट न आल्याने महिला नाराज झाली. क्रॉसवर्ड गेम आवडत नसल्याने महिला ते तिकीट घेऊन घरी आली. घरी आल्यानंतर मेरीलँड लॉटरी स्मार्टफोन एपवरून तिने तिकीट स्कॅन केलं. तिकीट स्कॅन करताच महिलेला अभिनंदनाचा आणि 50,000 डॉलर जिंकल्याचा मेसेज आला.

मेसेज पाहताच तिला आश्‍चर्याचा धक्काच बसला. आपल्याला लॉटरी लागली आहे, हे महिलेला खरं वाटत नव्हतं. तेव्हा तिने लॉटरी तिकीट कार्यालय (Lottery office of Maryland) गाठलं. तिथे तिने पुन्हा लॉटरी तिकीट स्कॅन केलं. तेव्हा खरंच आपल्याला 50 हजार डॉलर्सची लॉटरी लागली आहे, याची महिलेला खात्री झाली. लॉटरी लागल्याने तिला प्रचंड आनंद झाला आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *