महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . १ जानेवारी ।ओमिक्रॉन व्हेरिएंटच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकार पूर्ण काळजी घेत असले व बऱ्याच प्रमाणात निर्बंध लागू करण्यात आले असले तरी करोना (Coronavirus) बाधितांची संख्या दिवसागणिक वाढतच आहे. बाधितांमध्ये लोकप्रतिनिधी व सरकारमधील मंत्र्यांचंही प्रमाण मोठं आहे. राज्य मंत्रिमंडळातील तब्बल १० मंत्र्यांना करोनाची लागण झाली आहे. तर, राज्यातील विविध पक्षातील २० आमदारांची करोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे.
Nashik | A total of 10 ministers and over 20 MLA's have tested positive for COVID19 in Maharashtra, says Deputy CM Ajit Pawar pic.twitter.com/kc2yXVxC4t
— ANI (@ANI) January 1, 2022
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी आज सकाळी कोरेगाव भीमा येथील ऐतिहासिक विजयस्तंभास अभिवादन केले. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना राज्यातील करोना स्थितीबाबत त्यांनी माहिती दिली. ‘करोनाच्या बाबतीत कालच राज्य सरकारनं नवीन नियमावली जाहीर केली आहे. करोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता नागरिकांनी नियमांचं भान ठेवलं पाहिजे. लग्नसमारंभ आणि अशा प्रकारचे समारंभ मोठ्या स्वरूपात व्हावेत असं प्रत्येकाला वाटतं. परंतु, करोनाच्या नव्या स्वरूपातील विषाणूचा संसर्ग वेगाने होतो हे लक्षात घेतलं पाहिजे. पाश्चात्य देशात प्रचंड प्रमाणात बाधित रुग्ण सापडत आहेत. आपण दुसऱ्या लाटेची मोठी किंमत मोजली आहे. त्यामुळे नागरिकांच्या जीविताच्या काळजीपोटीच राज्यानं नियम कठोर केले आहेत. काही राज्यांनी रात्रीची जमावबंदी, टाळेबंदी केली आहे. राज्यात मुंबई आणि पुणे येथे करोनाबाधितांचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळं सर्व नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावं आणि करोनाचा संसर्ग पसरणार नाही याची काळजी घ्यावी, असं आवाहन अजित पवार यांनी केलं. अर्थात, करोना रुग्णांची संख्या वाढत राहिल्यास आणखी कठोर निर्बंध लावावे लागतील, असा इशाराही त्यांनी दिला.