महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . २ जानेवारी । तमिळनाडूतील निसर्गाचा अंदाज बांधण्यात हवामानशास्त्रज्ञ पूर्णपणे अपयशी ठरले. त्यामुळेच चेन्नईत पावसाबाबत रेड अलर्ट जारी केला जाऊ शकला नाही. या प्रकरणावरून मुख्यमंत्री एमके स्टॅलिन चांगलेच संतापले आहेत. याबाबत त्यांनी गृहमंत्री अमित शाह यांना पत्र लिहून नाराजी व्यक्त केली आहे. हवामान खात्याच्या निष्काळजीपणामुळे राज्याचे मोठे नुकसान झाले, असं स्टॅलिन यांनी म्हटलंय.
स्टॅलिन यांनी आपल्या पत्रात लिहिले आहे की, इंडियन मेट्रोलॉजिकल सेंटरकडून मिळालेल्या अलर्टनुसार राज्य सरकार पूर्वतयारी करतं. मात्र हे लोक सपशेल अपयशी ठरत आहेत. त्यांनी लिहिले की ३० डिसेंबर रोजी दुपारी १२ वाजता हवामान विभागाने बुलेटिनमध्ये म्हटले होते की, विल्लुप्पुरम, कडलोर आणि डेल्टा जिल्ह्यात तसेच चेन्नईतील आसपासच्या भागात जोरदार वारे वाहण्याची आणि वादळांच्या गडगडाटासह मध्यम पावसाची शक्यता आहे. त्यातच राज्याच्या किनारपट्टी भागात पावसाचा इशारा देण्यात आला होता. चेन्नईत हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला होता. मात्र, सर्वच ठिकाणी दुपारपासूनच जोरदार पावसाचा सुरुवात झाली होती.
नंतर संध्याकाळी सव्वाचार वाजता हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट जारी केला. यावेळेपर्यंत, चेन्नई, तिरुवल्लूर, कांचीपुरम आणि चेंगलपेट जिल्ह्यांमध्ये अति-तीव्रतेने मुसळधार पाऊस पडून झाला होता, परिणामी अनेक ठिकाणी पाणी साचले होते आणि शहरातील वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली होती. सरकारने हवामान खात्याच्या माहितीवर विश्वास ठेवत अत्यावश्यक पावले उचलली नाहीत. परिणामी मोठ्या प्रमाणात जीवित व वित्तहानी झाल्याचे स्टॅलिन यांचे म्हणणे आहे.
तामिळनाडूमध्ये अतिवृष्टीमुळे तीन जणांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे. मुसळधार पावसामुळे राजधानी चेन्नईत अनेक ठिकाणी पाणी साचले आहे. राज्याचे आपत्ती व्यवस्थापन मंत्री केकेएसएसआर रामचंद्रन नेम यांनी सांगितले की, पावसामुळे झालेल्या अपघातात तीन जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. राजधानी चेन्नईत १७ सेंटीमीटर पर्यंत पाऊस पडला. त्यामुळे शहरातील अनेक भाग जलमय झाले आहेत. अनेक ठिकाणी पाणी साचल्याने वाहतूक विस्कळीत झाली होती. तसेच प्रवाशांची देखील प्रचंड गैरसोय होत आहे.
हवामान खात्याने आता आणखी पावसाची शक्यता वर्तवली आहे. विभागाकडून करण्यात आलेल्या ट्विटमध्ये असे म्हटले आहे की, चेन्नई आणि आजूबाजूच्या ठिकाणी जोरदार पाऊस होईल. पुढील सहा तास या भागात पाऊस पडण्याचा अंदाज आहे. गुरुवारी चेन्नईत १९८ मिमी तर नुंगमबक्कममध्ये १६० मिमी पावसाची नोंद झाली. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, एमआरसी नगरमध्ये सर्वाधिक १७.६५ सेमी पावसाची नोंद झाली आहे. नंगंबक्कम येथे १४.६५ सेमी आणि मीनमबक्कम येथे १० सेमी पावसाची नोंद झाली.