Online Education: ऑनलाइन शिक्षणाचा दुष्परिणाम ७० टक्के विद्यार्थी या विषयात कच्चे

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . २ जानेवारी । कोरोनाच्या काळातही शिक्षण थांबले नसले तरी ऑनलाईनवर वेळ मारुन नेण्याचा प्रयत्न फसल्याचे चित्र आहे. ऑनलाईन शिक्षणाचा फुगा फुटला असून, पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांत भाषा स्तर ३०.२७, तर गणित स्तर २८.६४ टक्के आणि सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांत भाषा स्तर ५७.४८ तर गणित अध्ययन स्तर ४५.४९ टक्केच असल्याचे वास्तव औरंगाबाद जिल्ह्यातील पाहणीत समोर आले आहे.

हे नुकसान भरून काढण्यासाठी १०० दिवसांचा कृती कार्यक्रम हाती घेतला आहे. जिल्हा परिषदेच्या २,१३१ आणि नगरपालिकेच्या १८ आणि महापालिकेच्या ७२ शाळांतील पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांची अध्ययन स्तर निश्चितीची मोहीम शिक्षण विभागासह जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेने पूर्ण केली. मुख्य कार्यकारी अधिकारी नीलेश गटणे, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य डॉ. कलीमोद्दीन शेख, शिक्षणाधिकारी एम. के. देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली दि. २२ ते २४ डिसेंबर या काळात ही मोहीम राबविण्यात आली.

शैक्षणिक नुकसान भरून काढणार
भाषेत (मराठी) वाचन क्षमतेत अक्षर, शब्द, उतारा वाचन, समजून घेत वाचन, श्रवण, भाषण-संभाषण, अनुलेखन, श्रुतलेखन, स्वअभिव्यक्ती, गणितात अंकज्ञान, संख्याज्ञान (वर्गनिहाय), बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, शाब्दिक बेरीज, शाब्दिक वजाबाकी, शाब्दिक गुणाकार, शाब्दिक भागाकार आदी क्रियांची परीक्षा घेण्यात आली. त्यानुसार अध्ययन स्तर निश्चिती झाली. विद्यार्थ्यांचे झालेले शैक्षणिक नुकसान भरून काढण्यासाठी १ जानेवारीपासून भाषा व गणित या विषयांतील मूलभूत क्षमता प्राप्त होण्यासाठी १०० दिवसांचा कृती कार्यक्रम देण्यात येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *