निर्भया प्रकरण; आता प्रतीक्षा २० तारखेच्या फाशीची;

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४- ऑनलाईन :नवी दिल्ली: दिल्ली उच्च न्यायालयाने मंगळवारी निर्भया प्रकरणातील दोषी मुकेश सिंह यांची याचिका फेटाळून लावली. त्यामुळे निर्भया प्रकरणातील चारही दोषींना फाशी देण्याचा मार्ग आता पूर्णपणे मोकळा झाल्याचे दिसत आहे. कालच राष्ट्रीय मानवधिकार आयोगानेही दोषींची याचिका फेटाळून लावली होती. त्यामुळे आता येत्या २० तारखेला या चौघांची फाशी निश्चित मानली जात आहे.

फाशीची तारीख जसजशी जवळ येत आहे तसतसे दोषींकडून शिक्षा टाळण्यासाठी अत्यंत खालच्या थराला जाऊन प्रयत्न होत आहेत. मुकेश सिंह याने निर्भयावर अत्याचार झाले त्यादिवशी मी दिल्लीतच नव्हतो असा कांगावा करत उच्च न्यायालयात नव्याने याचिका दाखल केली होती. त्यामुळे आपल्या फाशीला स्थगिती द्यावी, असे मुकेशचे म्हणणे होते.
मला राजस्थानमधून ताब्यात घेण्यात आले. बलात्काराच्या घटनेच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे १७ डिसेंबर २०१२ रोजी मला दिल्लीत आणण्यात आले. यानंतर तिहार कारागृहात माझा प्रचंड छळ करण्यात आला, असा आरोपही मुकेशने केला होता. मात्र, न्यायालयाने हे सर्व युक्तिवाद फेटाळून लावले. त्यामुळे आता दोषींचे सर्व पर्याय संपल्यात जमा आहेत.
विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी दोषींच्या वकिलांनी आंतरराष्ट्रीय न्यायालयाकडे धाव घेतली होती. दोषींच्या वकिलांकडून आंतरराष्ट्रीय न्यायालयाला पत्र लिहण्यात आले आहे. यामध्ये २० मार्चला दोषींना देण्यात येणाऱ्या फाशीला स्थगिती द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *