महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .५ जानेवारी । गैरप्रकारामुळे ऐन वेळी रद्द कराव्या लागलेल्या म्हाडाच्या भरती परिक्षेचे नवीन वेळापत्रक जाहीर करण्यात आले. मात्र या वेळापत्रकात तारखांचा घोळ झाला आहे. म्हाडाच्या २९ आणि ३० जानेवारीला होणाऱ्या परीक्षेच्या दिवशीच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) परीक्षा होणार आहे. त्यामुळे आता म्हाडाने २९ आणि ३० ची परीक्षा रद्द केली असून उर्वरित ३१ जानेवारी ते ३ जानेवारीदरम्यान होणाऱ्या परीक्षा नियोजित वेळापत्रकानुसारच होणार आहेत.
नवीन तारखा येत्या दोन दिवसांत जाहीर केल्या जाणार आहेत. यासंबंधीचे परिपत्रक म्हाडाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे. एमपीएससीकडून पोलीस उपनिरीक्षक पदासाठी २९ जानेवारीला परीक्षा घेण्यात येणार होती. यासंबंधीचे वेळापत्रक डिसेंबरमध्येच जाहीर करण्यात आले होते. मात्र असे असताना स्पर्धा परीक्षेच्या तारखांची कोणतीही चाचपणी न करता नुकतेच म्हाडाने भरती परीक्षेचे वेळापत्रक जाहीर केले. ही बाब उमेदवारांनी लक्षात आणून दिल्यानंतर २९ जानेवारीची तारीख बदलण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली. या वेळापत्रकानुसार आता एमपीएससीची २२ जानेवारीला होणारी महाराष्ट्र दुय्यम सेवा मुख्य परीक्षा २०२० संयुक्त पेपर क्रमांक १ ही परीक्षा २९ जानेवारीला करण्यात आली, तर २९ जानेवारीला होणारी पोलीस उपनिरीक्षक पदाची परीक्षा ३० जानेवारीला घेण्याचे जाहीर केले. या सुधारित वेळापत्रकामुळे आता म्हाडाला २९ आणि ३० जानेवारीच्या परिक्षा रद्द कराव्या लागल्या आहेत. परीक्षा रद्द करण्याबाबतचे परिपत्रक म्हाडाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आल्याची माहिती म्हाडाचे सचिव राजकुमार सागर यांनी दिली. तर उर्वरित अर्थात ३१ जानेवारी, १,२ आणि ३ फेब्रुवारीला होणाऱ्या परीक्षा नियोजित वेळापत्रकानुसारच होतील. तर रद्द करण्यात आलेल्या २९ आणि ३० जानेवारीच्या नवीन तारखा दोन दिवसांत जाहीर करण्यात येतील, असेही त्यांनी सांगितले.