‘बुली बाई अ‍ॅप’ प्रकरणात धक्कादायक वळण; १२ वी पास १८ वर्षांची मुलगी मुख्य आरोपी; पोलीसही चक्रावले

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .५ जानेवारी । मुस्लिम महिलांचा लिलावं करणाऱ्या बुली बाई अ‍ॅपने (Bulli Bai App) खळबळ उडवून दिली असून मोठा वाद निर्माण झाला आहे. पोलिसांकडूनही याप्रकरणी सध्या वेगाने कारवाई सुरु आहे. मुंबई पोलिसांनी बंगळुरु येथून २१ वर्षाच्या तरुणाला ताब्यात घेत अटक केल्यानंतर आणखी एका तरुणीला अटक केली आहे. सायबर पोलिसांनी बंगळुरू येथून विशाल कुमार झा या तरुणाला अटक केली. यानंतर पोलिसांनी उत्तराखंड येथून १८ वर्षांच्या तरुणीला ताब्यात घेतले असून, ती प्रमुख आरोपी असल्याचं बोललं जात आहे.

तरुणीला उत्तराखंडमधील रुद्रपूर येथून अटक करण्यात आली. मुंबई सायबर पोलिसांनी गुन्हा दाखल केल्यानंतर करण्यात आलेली ही दुसरी अटक आहे. याआधी सायबर पोलिसांनी बंगळुरू येथून विशाल कुमार झा या तरुणाला अटक केली. विशाल हा मूळचा बिहारचा रहिवासी असून, तो स्थापत्य अभियांत्रिकीच्या दुसऱ्या वर्षांत शिकत आहे. ताब्यात घेतलेल्या तरुणीशी विशालची समाजमाध्यमांवरून ओळख झाली होती. दोघेही या प्रकरणाच्या कटातही सहभागी आहेत. दरम्यान विशालच्या वकिलांनी त्याला चुकीच्या पद्धतीने गोवण्यात आल्याचा आरोप केला आहे.

या तरुणीला उधम सिंग नगर जिल्ह्यातील न्यायाधीशांसमोर हजर करण्यात आलं असता तिचं मुंबईला प्रत्यार्पण करण्याची परवानगी देण्यात आली. पोलीस आणि तरुणी अद्यापही उत्तराखंडमध्ये असून मुंबईतून महिला पोलीस अधिकारी येण्याची वाट पाहत असल्याचं जिल्हा पोलिसांनी सांगितलं आहे.

तरुणीची नेमकी काय भूमिका होती यासंबंधी पोलिसांनी कोणतीही माहिती दिली नसली तरी ती मुख्य आरोपी असल्याचा संशय आहे. दरम्यान उत्तराखंड पोलिसांनी आपण याप्रकरणी चौकशी केली नसल्याचं स्पष्ट केल आहे. फक्त मुंबई पोलिसांकडून तरुणीची चौकशी करण्यात आली असल्याचं त्यांनी सांगितलं.

“उत्तराखंड पोलिसांनी तरुणीला अटक करण्यासाठी मुंबई पोलिसांना एक महिला कॉन्स्टेबल देत मदत केली, त्यांच्याकडे महिला कॉन्स्टेबल नसल्याने ही मदत देण्यात आली,” असं उत्तराखंड पोलीस आयुक्तांनी सांगितलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *