सरकारला कठोर निर्णय घ्यायला भाग पाडू नका : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ऑनलाईन ; मुंबई : करोना विषाणूंबरोबर सुरू झालेले जागतिक युद्ध आहे. आपण करीत असलेल्या उपाययोजना समाधानकारक असल्या, तरी विषाणू एकेक पाऊल पुढे सरकत असल्याने सरकारला कठोर निर्णय घ्यायला भाग पाडू नका, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी राज्यातील जनतेला सांगितले. घाबरून अन्नधान्य, जीवनावश्यक वस्तू आणि औषधांचा साठा करू नये, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

राज्यातील जनतेच्या सहकार्यामुळे आपण ही साथ अजून तरी नियंत्रणात ठेवली आहे. मात्र आणखी शर्थीचे प्रयत्न केले तरच महाराष्ट्र या संकटावर मात करेल, असा विश्वास ठाकरे यांनी व्यक्त केला आहे. पंतप्रधान आणि केंद्रीय आरोग्यमंत्र्यांशी आपले आजही बोलणे झाले आहे. त्यांनी राज्याला पुरेपूर सहकार्य केले जाईल, असा विश्वास दिल्याचे ठाकरे यांनी सांगितले.

मुख्यमंत्र्यांनी राज्यातील जनतेशी सोशल मीडियाच्या माध्यमातून संवाद साधला. मुख्यमंत्री म्हणाले की, सरकार देत असलेल्या सूचना लोकांनी काटेकोरपणे पाळल्या पाहिजेत. सरकारच्या आवाहनानंतर सर्वधर्मीयांच्या प्रार्थनास्थळांवर गर्दी खूपच कमी झाली असली, तरी ती पूर्णपणे बंद झाली पाहिजे. शासकीय कार्यालय, खासगी कार्यालयातील कर्मचार्‍यांची उपस्थिती कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र आवश्यकता नसेल तर घराबाहेर पडू नका. जिथे शक्य आहे तिथे वर्क फ्रॉम होम या पद्धतीने काम करा, असे ठाकरे म्हणाले.

कोरोनाची लागण झालेले बहुतेक सर्व रुग्ण बाहेरून आलेले आहेत. बाहेरून येणारी माणसेही आपलीच आहेत. नातेवाईक आहेत. मात्र त्यांनी इथे येताना सर्व काळजी घेऊन येणे महत्त्वाचे आहे. ज्यांनी होम क्वारंटाईनचा पर्याय निवडला, त्यांच्या हातावर शिक्के मारण्यात आले आहेत. अशा व्यक्तींनी आसपास वावरू नये, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले.

आपले जवान म्हणजे आपले डॉक्टर, नर्सेस, बसचे ड्रायव्हर, स्वयंसेवी सामाजिक संस्था यासाठी दिवसरात्र काम करत आहेत. आपण त्यांना सहकार्य करायचे म्हणजे काय करायचे तर फक्त घरी राहायचे. इतके तर आपण करू शकतो ना? असा सवाल मुख्यमंत्र्यांनी केला आहे. चीनमध्ये या विषाणूचा पहिल्यांदा प्रादुर्भाव आढळला असला, तरी आता चीनने अनेक कडक उपाययोजना केल्यामुळे यातून ते बाहेर पडत आहेत. आपल्यालाही बाहेर पडायचे आहे. त्याकरिता पुन्हा एकदा सहकार्य करा, आपण नक्की या संकटातून बाहेर पडू, असाही विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला आहे.

सध्याच्या परिस्थितीची तुलना युद्धाबरोबर करताना उद्धव ठाकरे म्हणाले, युद्ध हे जिद्दीने लढायचे असते आणि जिंकायचे असते. युद्धाचा अनुभव वाईट असतो. युद्धानंतरची परिस्थिती वाईट असते. देशासाठी छातीचा कोट करून आपले जवान लढतात, धारातीर्थी पडतात. आजचे युद्ध हे विषाणूशी युद्ध आहे. वॉर अगेन्स्ट व्हायरस सुरू झाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *