महाराष्ट्र २४ ऑनलाईन ; मार्केटयार्ड : बाजार समित्यांमध्ये जीवनावश्यक माल मिळतो. त्यामुळे त्या बंद ठेवणे योग्य नाही. तसेच शेतकऱ्यांचा शेतमाल विक्रीमध्ये कोणतीही अडचण येणार नाही. ग्राहकांना सुरळीत फळे, भाजीपाला, अन्नधान्य मिळावे यासाठी राज्यातील बाजार समित्यांनी योग्य त्या उपाययोजना करण्याचे आदेश पणन संचालक सुनील पवार यांनी राज्यातील बाजार समित्यांना दिले आहेत.
फळे भाजीपाला, अन्नधान्य, कडधान्ये आदी शेतमाल हा जीवनावश्यक असून, कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर ग्राहकांना या वस्तूंचा पुरवठा सुरळीत व्हावा आणि ग्राहकांअभावी शेतमालाचे नुकसान होऊ नये, यासाठी बाजार समित्यांमधील व्यवहार सुरळीत असणे गरजेचे आहे. बाजार समित्यांनी बाजार वेळा संपल्यावर आणि शक्यतो रात्रीच्या वेळी युद्धपातळीवर स्वच्छता आणि निर्जंतुकीकरणाची कामे करण्याचे आदेश परिपत्रकाद्वारे देण्यात आले आहेत.
जीवनावश्यक शेतमालाच्या आवकेबाबत दैनंदिन आढावा घ्यावा आणि शेतकऱ्यांना शेतमाल विक्री करण्यामध्ये कोणतीही अडचण येणार नाही. तसेच जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा सुरळीत राहील याकडे गांभीर्याने लक्ष देण्याचे आदेश पणान संचालकांनी दिले आहेत.
दरम्यान, दूध, धान्य, भाजीपाला अशा जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा कोणत्याही परिस्थितीत सुरळीत ठेवण्याबाबतच्या सूचना विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिल्या आहेत. विभागीय आयुक्तालयात अन्न, नागरी पुरवठा विभाग, पणन विभाग, दुग्ध विभागाच्या प्रशासकीय अधिका-यांची बैठक विभागीय आयुक्त डॉ. म्हैसेकर यांच्या अध्यक्षतेखाली झाली, त्यावेळी त्यांनी या सूचना दिल्या आहेत.