महाराष्ट्र २४ ऑनलाईन ; नवी दिल्ली :करोना चा प्रसार रोखण्यासाठी भारत सरकारने कठोर निर्णय घेण्यास सुरुवात केली आहे. 22 मार्चपासून पुढच्या एक आठवड्यासाठी भारतात एकही प्रवासी विमान दाखल होणार नाही, असं पत्रसूचना कार्यालयातर्फे सांगण्यात आलं आहे.
याशिवाय केंद्र सरकारतर्फे राज्यांना आणखी काही निर्बंध घालण्यासंदर्भात सूचना देण्यात आल्या आहेत. रेल्वेत रुग्ण आणि विद्यार्थ्यांशिवाय इतर कुणालाही सवलतीच्या दरात प्रवास करू दिला जाणार नाही. शक्यतो ज्येष्ठ नागरिकांनी रेल्वे आणि बसप्रवास टाळावा यासाठी हा नियम बदलण्यात आला आहे. वयाच्या 65 वर्षांवरील नागरिकांनी आणि 10 वर्षांखालील मुलांनी अत्यंत गरजेचं असल्याशिवाय घराबाहेर पडू नये, असं सांगण्यात आलं आहे.
बी आणि सी श्रेणीच्या सरकारी कर्मचाऱ्यांनी एकाआड एक आठवडा कामावर यावं आणि कार्यालयीन उपस्थिती शक्य तितकी कमी राहावी यासाठी प्रयत्न करावेत, असंही केंद्र सरकारने कळवलं आहे.
फक्त कोरोनाप्रभावित राज्यांतच नाही तर या सूचना देशभरासाठी लागू करण्याचा केंद्राचा निर्णय आहे.दरम्यान पंतप्रधान कार्यालयाकडून संपूर्ण लॉकडाउनचा निर्णय नसल्याचं सांगण्यात येत आहे.
पुढचा निर्णय येईपर्यंत पुण्यासह कल्याण, डोंबवली परिसरातली दुकानं बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जीवनावश्यक वस्तू आणि औषधांची दुकानं वगळता अन्य दुकानांसाठी हा निर्णय आहे.
दरम्यान देशभरात कोरोना व्हायरसमुळे मृतांचा आकडा ३ वर पोहोचला आहे. 166 रुग्णांना लागण झाली आहे. त्यातले सर्वाधिक रुग्ण हे महाराष्ट्रात आढळले आहे. त्यामुळे राज्यात याअगोदरच लाॅकडाउन परिस्थिती निर्माण झाली आहे.
दरम्यान महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीसुद्धा जनतेशी संवाद साधला. ज्या नागरिकांना होम क्वॉरंटाईन सांगितले आहे त्यांनी स्वत:हूनच घरी राहून स्वत:बरोबरच इतरांचीही काळजी घ्यावी. परिसरात किंवा इतरत्र फिरू नये. अशा व्यक्तींवर शासनाचे लक्ष असून होम क्वॉरंटाईनचा शिक्का असलेली व्यक्ती जर बाहेर फिरताना आढळली तर तिला सक्तीने रुग्णालयात भरती करण्यात येईल, असं सरकारकडून सांगण्यात आलं आहे.