मांढरदेव येथील काळेश्वरी देवी यात्रा रद्द ; जमावबंदी आदेश लागू

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .९ जानेवारी । करोनाचा वाढता प्रादुर्भाव व यात्रेच्या निमित्ताने होणारी गर्दी पाहता तिसऱ्या लाटेतील करोना विषाणूचा संसर्ग रोखण्याच्या अनुषंगाने वाई तालुक्यातील काळेश्वरी देवी (मांढरदेव) व दावजी बुवा (सुरुर) या यात्रा आयोजित करण्यास मनाई करण्यात आली आहे. या यात्रेनिमित्त प्रांताधिकारी राजेंद्रकुमार जाधव यांनी दि १० जानेवारी ते १ फेब्रुवारी २०२२ या कालावधीत जमा बंदी आदेश लागू केले आहेत.

तालुक्यातील मांढरदेव येथील काळेश्वरी देवीची आणि सुरुर येथील धावजी बुवाची वार्षिक यात्रा येत्या दि १६ ते १८ जानेवारी रोजी आहे. या यात्रेच्या निमित्ताने महाराष्ट्रासह कर्नाटक व आंध्र राज्यातील लाखो भाविक दरवर्षी देवीच्या दर्शनासाठी येत असतात. यात्रेचा मुख्य दिवस शांकभरी पोर्णिमेला (दि १७ जानेवारी) रोजी आहे. या दिवशी तसेच प्रत्येक मंगळवार, शुक्रवार या देवीच्या वारी आणि आमवस्या, पोर्णिमेला अशी यात्रेपूर्वी १५ दिवस आणि यात्रेनंतर १५ दिवस याठिकाणी भाविकांची मोठी वर्दळ असते. त्यामुळे गर्दी होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर करोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी वाईचे प्रांताधिकारी यांनी जमाव बंदीचा आदेश लागू केला आहे.

या आदेशानुसार काळूबाई देवी यात्रा, मांढरदेव ता. वाई व दावजी बुवा यात्रा सुरुर यात्रा आयोजित करण्यास मनाई करण्यात येत आहे. तसेच कोणत्याही प्रकारे गर्दी आकर्षित होणार नाही अशा धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमाचे अथवा मिरवणुकांचे आयोजन करण्यात येऊ नये. यात्रेतील धार्मिक कार्यक्रम मंदिराचे पुजारी व ट्रस्टचे सदस्य यांनीच पार पाडावी. त्याव्यतिरिक्त इतर व्यक्तींना कार्यक्रमास उपस्थित राहण्यास मनाई असेल. तसेच यात्रा कालावधीत ट्रस्टी व पुजारी वगळून इतर व्यक्तींना दर्शनासाठी बंदी असेल. यात्रा कालावधीत भाविकांना तसेच स्थानिकांना रहिवासासाठी तंबू उभारण्यास तसेच पशू व पक्षी यांचा बळी देण्यास मनाई करण्यात आली आहे.

१० जानेवारी ते १ फेब्रुवारी या कालावधीत वाई तालुक्यातील मौजे मांढरदेव गावासह मांढरदेव गावापासून १० किलोमिटर परिसर, मौजे परखंदी, डुईचीवाडी, पिराचीवाडी, बालेघर, सुलतानपूर, लोहारे, वेरुळी, मुंगसेवाडी, सटालेवाडी, एमआयडीसी वाई, शहबाग, अंबा खिंड, बोपर्डी, धावडी फाटा रेणुसेवस्ती, गुंडेवाडी, कोचळेवाडी, काळुबाई मंदिर, जमदाडे वस्ती शेजारी वाई, वाई शहर व सुरुर तसेच खंडाळा तालुक्यातील कर्नवडी, झगलवाडी, अतिट व लिंबाचीवाडी येथील सार्वजनिक ठिकाणी अगर रस्त्यावर मोठ्या संख्यंने एकत्र येणे अथवा गर्दी करण्यासही मनाई करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *