महाराष्ट्रातही पारा घसरला, परभणीत दाट धुक्याची चादर

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .१६ जानेवारी । सध्या देशात कडाक्याची थंडी पडली आहे. विशेषत उत्तर भारतात थंडीचा जोर अधिक असल्याचे दिसत आहे. काश्मीरपासून पंजाबपर्यंत, राष्ट्रीय राजधानी दिल्लीपासून उत्तर प्रदेश, उत्तराखंडपर्यंत, पूर्व भारतातील सर्व जिल्ह्यांमध्ये थंडीची लाट कायम आहे. दिल्लीत आजही असेच वातावरण राहण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. दिल्लीत विविध ठिकाणी तापमान 8 अंशाच्या खाली नोंदवण्यात आले आहे. पुढील चार दिवस दिल्लीत दाट ते मध्यम धुके राहण्याची शक्यता देखील हवामान विभागाने वर्तवली आहे. तसेच महाराष्ट्रातही थंडीचा कडाका कायम आहे. अनेक ठिकाणी दाट धुके पडत आहे.

कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात कोरड्या हवामानामुळे पारा कमालीचा घसरला आहे. महाबळेश्वर येथे तर जोराची गोठवणारी थंडी पडली आहे. जानेवारीच्या पहिल्या आठवड्यापासून मुंबईतही चांगली थंडी जाणवू लागली आहे. गेल्या 10 वर्षात मुंबईकरांना यंदाच्या जानेवारीत पहिल्यांदाच या थंडीचा अनुभव घेतला. यंदाच्या हंगामातील 10 जानेवारी हा सर्वाधिक थंड दिवस ठरला. कोरडे हवामान आणि उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे मुंबईचा पारा घसरला. 10 जानेवारीनंतर तीन दिवस मुंबईत गारठा जाणवला. त्यानंतर मात्र, मुंबईच्या किमान तापमानात वाढ झाली आहे. असे असले तरीही राज्यभरात मात्र अद्यापही थंडीचा चांगलाच कडाका आहे.

मागच्या आठवडाभरापासून परभणी जिल्ह्यातील वातावरणात देखील चांगलाच बदल झाला आहे. पहिल्यांदा थंडी त्यात जोरदार अवकाळी पाऊस पडला आणि आज पहाटेपासूनच सर्वत्र धुक्याची चादर पडल्याचे चित्र पाहायला मिळाले.अख्खे परभणी शहर हे दाट धुक्यात हरवले आहे. इमारती,रस्ते,या धुक्याने दिसेनासे झाले असून रब्बी पिकांना या बदलत्या वातावरणाचा फटका बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. रविवारची पहाट परभणीकरांसाठी दाट धुके घेऊन आल्याने सकाळी मॉर्निंग वॉक ला ही जाणाऱ्यांची संख्या कमी दिसून आली.

दरम्यान, काश्मीरमध्ये 21 डिसेंबर ते 31 जानेवारी हा काळ चिल्लई कलान म्हणून ओळखला जातो. हे 40 दिवस हिवाळ्यातील सर्वात थंड काळ असतो. त्यामुळेच काश्मीरमध्ये सध्या कडाक्याची थंडी असून खोऱ्यातील तापमानाचा पारा घसरला आहे. या हंगामात सामान्य तापमानापेक्षा रात्रीचे तापमान अनेक अंशांनी खाली गेले आहे. जम्मू आणि काश्मीरच्या श्रीनगरमध्ये पारा शून्य ते 4.5 अंश सेल्सिअसपर्यंत घसरला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *