रेमडेसिविरला कुणी विचारेना ; आधी रोज लागायचे चार हजार, आता महिन्याला 50

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि १६ जानेवारी ।औरंगाबाद ; दुसऱ्या लाटेत रेमडेसिविर इंजेक्शनची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली होती. त्यामुळे जिल्ह्याला दररोज चार हजार इंजेक्शनची गरज भासत होती. आता तिसऱ्या लाटेत रुग्णसंख्या वाढत असली तरी आजाराचे प्रमाण गंभीर नाही. त्यामुळे रेमडेसिविर इंजेक्शनची फारशी गरज भासत नाही. आता महिन्याला पन्नास इंजेक्शनदेखील लागत नसल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत रेमडेसिविर इंजेक्शनसाठी रांगा लागत होत्या. अनेकांनी काळ्याबाजारात हे इंजेक्शन विकून भरमसाट कमाई केली. इतर जिल्ह्यांतील रुग्णांचे नातेवाईक शहरात हे इंजेक्शन घेण्यासाठी येत होते. आता तिसऱ्या लाटेत असे चित्र कुठेच दिसत नाही.

मेडिकल असोसिएशनचे सचिव विनोद लोहाडे म्हणाले, दुसऱ्या लाटेत रेमडेसिविरची मागणी मोठ्या प्रमाणात होती. एकाच वेळी दोन ते तीन हजार इंजेक्शन लागत होते. आता महिन्याला पन्नास इंजेक्शन पुरेसे होतात. सध्या रुग्ण भरती होण्याचे प्रमाण कमी आहे. तसेच भरती झालेल्या रुग्णांना इंजेक्शनची गरज भासत नसल्याने शहरातील मेडिकल दुकानदारांनी फारशी खरेदी केलेली नाही.

फुप्फुसाला संसर्ग होत नसल्यामुळे गरज नाही
फिजिशियन असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. संजय पाटणे यांनी सांगितले की, दुसऱ्या लाटेत लोकांना संसर्ग अधिक झाला होता. त्यामुळे रेमडेसिविरचा डोस देण्यात येत होता. आता लोकांना फुप्फुसाला संसर्ग होत नाही. त्यामुळे रेमडेसिविरची गरज भासत नाही. सध्या रुग्ण भरती होण्याचे प्रमाणही कमी आहे. ज्यांना गोळ्या दिल्यानंतर पाच दिवसांनंतरही ताप उतरत नाही, संसर्ग कमी होत नाही, अशा रुग्णांनाच कमी प्रमाणात हे इंजेक्शन दिले जाते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *