महाबळेश्‍वरमधील पर्यटन थांबले

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .१९ जानेवारी । कोरोना संकटाने लॉकडाऊन केलेली पर्यटनस्थळे आता कोठे मोकळा श्‍वास घेताहेत, व्यावसायिकांची आर्थिक घडी आता कोठे व्यवस्थित बसत असतानाच ओमायक्रॉन संकटाच्या पार्श्‍वभूमीवर पुन्हा पर्यटनस्थळांवर निर्बंध आल्याने जगप्रसिद्ध पर्यटन स्थळ असलेल्या महाबळेश्‍वरमधील पर्यटन ठप्प झाले असून वेण्णा लेकसह सर्व प्रेक्षणीय पॉईंटस् ओस पडले आहेत. यामुळे येथील सर्वच छोटे-मोठे व्यावसायिक हवालदिल झाले असून त्यांच्यावर उपासमारीची वेळ येणार आहे.

पर्यटन हंगामात दोन पैसे मिळतील या आशेवर व्यवसायास सुरुवात केली अन आता कुठे चार पैसे मिळतील अशी आस लावून व्यावसायिक बसलेले असतानाच कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे शासनाने प्रेक्षणीय स्थळेच बंद करण्याचा निर्णय घेतला. याचा फटका येथील विशेषत: छोट्या व्यावसायिकांना, कामगारांना बसणार आहे. पर्यटनावर आधारित सर्वच घटकांवर याचा मोठा परिणाम होणार आहे.

महाबळेश्‍वरला एप्रिल, मे, महिन्यात उन्हाळी हंगाम, दिवाळी हंगाम, नाताळासोबतच आता पावसाळी हंगामातदेखील पर्यटक येथे भेट देतात. वर्षाकाठी 15 ते 20 लाख पर्यटक या पर्यटनस्थळी येतातच. महाबळेश्‍वरच्या व्यवसायाचा मुख्य केंद्रबिंदू पर्यटक असून येथे येणार्‍या पर्यटकांवर आधारित व्यवसायांवरच येथील जीवनमान, अर्थकारण अवलंबून असते. महाबळेश्वरमध्ये पर्यटकांवर आधारित हातावर पोट असलेला वर्ग मोठा असून रूम भरणारे कॅनव्हर्सर, प्रेक्षणीय स्थळे दाखविणारे गाईड्स, स्ट्रॉबेरी विक्रेते, वेण्णालेक, मुंबई पॉईंटसह प्रेक्षणीय स्थळांवर असलेले घोडे व्यावसायिक,स्थानिक टॅक्सी चालक, मालक,चप्पल विक्रेते, छोटी-मोठी हॉटेल्स यामध्ये काम करणारा स्थानिक व विविध राज्यातून येथे कामाला आलेला कामगार वर्ग, छोटी, मोठी रेस्टॉरंट, ढाबे यांसह न्याहरी निवास योजनेची छोटीछोटी घरगुती लॉजिंगमधील कामगार यांचा यात समावेश होतो. पर्यटनस्थळांवरील निर्बंधांमुळे या सर्व कामगारांवर उपासमारीची वेळ येणार आहे.

कोरोनाच्या पहिल्या लाटेमध्ये मार्चमध्ये लॉकडाऊन झाल्यामुळे मुख्य मे महिन्याचा हंगाम वाया गेला त्यानंतर मिशन बिगेन अंतर्गत काहीकाळ निर्बंध शिथिल केल्यामुळे थोडाफार दिलासा मिळाला होता. मात्र, पुन्हा गतवर्षी उन्हाळी हंगाम प्रारंभ होताना पुन्हा लॉकडाऊन झाले अन पुन्हा एकदा कामगार, व्यावसायिकांवर संकट कोसळले. एकीकडे हंगामच गेल्याने आर्थिक चणचण त्यानंतर येणारे चार महिने धो धो बरसणारा पाऊस अशा दुहेरी संकटात येथील व्यावसायिक सापडले होते. त्यानंतर दिवाळी व नाताळ हंगाम चांगला गेल्याने थोडेबहुत पैसे हाती लागले. आता कुठे सर्वकाही सुरळीत झाले असतानाच पुन्हा निर्बंध आल्याने व्यावसायिक हवालदिल झाले आहेत.येथील ऑर्थरसीट, एल्फिन्स्टन पॉईंट, केटस, लॉडविक पॉईंट, लिंगमळा धबधबा ही प्रेक्षणीय स्थळे बंद केल्याने महाबळेश्‍वरला पर्यटनास येणार्‍यांची संख्या रोडावली असून याचा मोठा फटका येथील अर्थकारणाला बसणार आहे.प्रेक्षणीय स्थळेच बंद करण्यात आल्याने यावर आधारित असलेले गाईड, छोटे छोटे व्यावसायीक, टॅक्सी चालक, घोडे व्यावसायिकांच्या रोजीरोटीचा मोठा प्रश्न उभा राहिला आहे. दरम्यान पर्यटकांची रेलचेल कमी झाल्याने मुख्य बाजारपेठेत शुकशुकाट आहे. अनेक हॉटेल्सची बुकिंग्ज (आरक्षण) केवळ पर्यटन स्थळे बंद असल्याने रद्द होत आहेत. येथे डेस्टिनेशन वेडिंग्जच्या माध्यमातून होणार्‍या लाखो-करोडोंच्या उलाढालीस ब्रेक लागला असून त्याचा फटका छोट्या मोठ्या हॉटेल्ससह त्यावर आधारित असलेल्या स्थानिक व्यावसायिकांना बसला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *