![]()
महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .२० जानेवारी । पुणे । विद्युत वाहिनी किंवा सेवा वाहिनी टाकण्यासाठी महापालिकेकडून खासगी कंपन्या, बांधकाम व्यवसायिकांना प्रतिमीटर १२ हजार १९२ रुपये शुल्क आकारले जाते. मात्र, बालेवाडी येथे एका बांधकाम व्यावसायिकाने आम्ही महावितरणचे प्रतिनिधी असल्याने २ हजार ३५० रुपये दराने खोदाई शुल्क आकारावे अशी मागणी केली. त्यामुळे खोदाई शुल्काची रक्कम कमी होऊन ४७ लाखांवरून थेट ९ लाख इतकी झाली आहे. दरम्यान, महापालिकेने प्रथमच अशी परवानगी दिल्याने महापालिकेचे ३८ लाखाचे नुकसान होत असून, भविष्यात असे अनेक प्रस्ताव दाखल होऊन कोट्यवधी रुपयांच्या उत्पन्नावर पाणी सोडावे लागण्याची भीती अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.
बालेवाडी भागात आर्चिड हॉटेलजवळ एमएससीबीचे उपक्रेंद्र आहे. या केंद्रातून एक बांधकाम व्यावसायिकाला साइटपर्यंत भूमिगत वीज वाहिनी टाकायची असल्याने त्यांनी महापालिकेकडे अर्ज करून आवश्यक शुल्क भरण्यास तयार असल्याचे लेखी दिले. महापालिकेने सबस्टेशन ते बांधकाम साइटदरम्यान ३८८ मीटर लांबीच्या केबल टाकण्याच्या कामासाठी ४८ लाख ३० हजार ४९६ रुपयांचे शुल्क भरण्यास सांगितले. मात्र, हे शुल्क जास्त असल्याने त्यानंतर बांधकाम व्यावसायिकांनी आम्ही महावितरणचे प्रतिनिधी आहोत, त्यामुळे महावितरणच्या दराने खोदाई शुल्कास मान्यता द्यावी अशी मागणी केली. महापालिकेकडून अशा प्रकारे परवानगी दिली जात नसल्याने हा प्रस्ताव काही महिने पडून होता. महापालिकेने महावितरणकडे चौकशी केल्यानंतर त्यांच्याकडून संबंधित बांधकाम व्यावसायिक आमचा प्रतिनिधी म्हणून काम करत असून, त्याच्याकडून आम्ही सुपरव्हिजन शुल्क घेत असल्याचे कळविले. मात्र, महापालिकेच्या खोदाई धोरणानुसार केवळ महावितरणसाठीच खोदाई शुल्कात सवलत आहे, ही विद्युत वाहिनी टाकल्याने संबंधित व्यवसायात वाढ होणार आहे, त्यामुळे या कामास व्यावसायिक दरच लावला पाहिजे असे पत्र पथ विभागाने अतिरिक्त आयुक्त डॉ. कुणाल खेमणार यांना देऊन खोदाई शुल्क कमी करण्यास नकारात्मक अभिप्राय दिला आहे. दरम्यान, त्यानंतरही या बांधकाम व्यावसायिकास सवलत दिल्याने आता ४७ लाख ३० हजारांऐवजी केवळ ९ लाख ११ हजार रुपयांचे शुल्क द्यावे लागणार आहे.