महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .२० जानेवारी । Gold Price Today : देशातील सराफा बाजारांत सोन्याच्या दरात तेजी आली आहे. सोन्याचा दर आज गुरुवारी (दि.२०) प्रति १० ग्रॅम ४८,६०० रुपयांच्या पार झाला. सोन्यासह चांदीही महागली आहे. सोन्याच्या दरात आज ३७० रुपयांची वाढ झाली. यामुळे प्रति १० ग्रॅम सोने ४८,६२० रुपयांवर पोहोचले. तर चांदीचा प्रति किलो दर ६४,४०४ रुपयांवर गेला आहे.
सराफा बाजारात आज (Gold Price Today) २४ कॅरेट सोन्याचा दर ४८,६२० रुपयांवर खुला झाला. काल बुधवारी सोन्याचा दर ४८,२५० रुपयांवर जाऊन बंद झाला. त्यात आज ३७० रुपयांची तेजी आली. २३ कॅरेट सोने ४८,४२५ रुपये आहे. २२ कॅरेट सोने ४४,५३६ रुपये, तर १८ कॅरेट सोन्याचा दर ३६,४६५ रुपये आहे.
चांदीचा प्रति किलो दर काल बुधवारी ६३,५५७ रुपये होता. त्यात ८४७ रुपयांची तेजी आली आहे. यामुळे चांदीचा दर ६४,४०४ रुपयांवर पोहोचला आहे.
२०२१ वर्षाच्या दुसऱ्या सहामाहीत दर खाली आल्याने सोन्याची झळाळी कमी झाली होती. पण कोरोना- ओमायक्रॉन महामारीचे संकट, महागाईची चिंता यामुळे नवीन वर्ष २०२२ मध्ये सोन्याचा प्रति १० ग्रॅम दर (प्रति तोळी) ५५ हजार रुपयांपर्यंत जाण्याची शक्यता आहे, असा अंदाज याआधी सराफा बाजारातील तज्ज्ञांनी व्यक्त केला होता.