प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी एसटी महामंडळाचा मोठा निर्णय

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि २१ जानेवारी । एसटीची सेवा सुरळीत सुरू राहावी म्हणून आता यांत्रिक कर्मचारी, वाहतूक निरीक्षक आणि वाहतूक नियंत्रकाचा वापर ‘चालक’ आणि ‘वाहक’ म्हणून करण्यात येणार आहे. विलीनीकरणाच्या मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी सुरू केलेला संप अद्यापही सुरु असल्यामुळे प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी यांत्रिक कर्मचारी व सहाय्यक वाहतूक निरीक्षकांना एसटी बसेसवर ‘चालक’ म्हणून तर वाहतूक नियंत्रकांचा ‘वाहक’ म्हणून वापर करून बसफेऱ्या वाढवण्याचे एसटी महामंडळाने ठरवले आहे.

एसटी कर्मचाऱ्यांचा संप गेल्या दोन महिन्यांपेक्षा अधिक काळापासून सुरू आहे आणि त्यामध्ये चालक आणि वाहक मोठ्या संख्येने असल्यामुळे त्याचा फटका एसटी बसच्या वाहतुकीला बसत आहे. यावर पर्याय म्हणून हा निर्णय एसटी महामंडळाने निर्णय घेतला आहे. त्यासाठी या कर्मचाऱ्याना त्या त्या आगारात प्रशिक्षणही दिले जाणार आहे. एसटी महामंडळाच्या निर्णयानुसार संप कालावधीमध्ये पहिल्या टप्प्यात चालक पदातून ज्यांना वाहक परीक्षक व सहाय्यक वाहतूक निरीक्षक पदावर पदोन्नती दिली गेली, त्या कर्मचाऱ्यांना दोन दिवसांचे उजळणी प्रशिक्षण देऊन त्यांचा प्रवासी वाहनांवर चालक म्हणून वापर केला जाईल.

दुसर्‍या टप्प्यात अवजड वाहन चालविण्याचा ज्या यांत्रिकी कर्मचार्‍यांकडे परवाना आहे, अशा कर्मचार्‍यांची विभागीय पातळीवर माहिती गोळा करून त्यांच्याकडून विभागीय पातळीवर प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे तत्काळ आनलाईन अर्ज करून प्रवासी वाहन चालक अनुज्ञप्ती बिल्ला काढावयाचा आहे. यांत्रिक अथवा वाहतूक कर्मचाऱ्यांचा वापर संप काळात चालक म्हणून आणि वाहतूक नियंत्रक यांचा वापर संप काळात वाहक म्हणून केल्यास अशा कर्मचाऱ्यांना प्रती दिन ३०० रुपये एवढा प्रोत्साहन भत्ता देण्याचीही तरतूद करण्याची सूचना महामंडळाने सर्व विभाग नियंत्रकांना करण्याचेही आदेशात नमूद केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *