महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि २१ जानेवारी । 30 जानेवारी 1948 ला महात्मा गांधी प्रार्थना सभेत सहभागी होण्यासाठी जात असतानाच नथुराम गोडसे यांनी बापूंवर गोळ्या झाडत त्यांची हत्या केली. देशाच्या इतिहासातील तो दिवस आजही काळा दिवस म्हणूनच गणला जातो. गांधी हत्येला देशानं विरोध केला आणि त्यांची हत्या करणाऱ्या नथुराम गोडसे यांच्याविरोधात न्यायालयात खटला उभा राहिला.
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या हत्येमागचं मूळ कारण काय होतं, यावर आजपर्यंत अनेक कलाकृती साकारण्यात आल्या. इतकंच काय, तर त्यावरून बऱ्याच वादांनीही तोंड वर काढलं. त्यातच आता राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांचंही नाव समोर आलं आहे.
कोल्हे यांची मध्यवर्ती भूमिका असणाऱ्या अर्थात त्यांनी नथुराम गोडसे साकारलेल्या चित्रपटाचा ट्रेलर सध्या चर्चेत आला आहे. खासदार पदी असणाऱ्या आणि काही ऐतिहासिक भूमिकांना जीवंत करणाऱ्या कोल्हे यांनी गोडसेंची भूमिका साकारल्याचं पाहून सध्या यावर संमिश्र प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत.
अशोक त्यागी दिग्दर्शित ‘वाय आय किल्ड गांधी’ (why i killed gandhi)या चित्रपटाच्या अवघ्या दोन अडीत मिनिटांच्या व्हिडीओमध्ये गांधी हत्या आणि त्याभोवती असणारं चर्चा, वादाचं वलय यांची झलक पाहायला मिळते.
फाळणीनंतर देशात उदभवलेली परिस्थिती आणि त्यानंतर सीमेपलीकडे असणाऱ्या हिंदूवर होणाऱ्या अत्याचारांचं मूळ कारण गांधी आहेत, असे संवाद या ट्रेलरमध्ये एकण्यास मिळतात.
एकाएकी या ट्रेलरमुळं सुरु झालेल्या वादामुळं या चित्रपटाबाबत आणि कोल्हे यांच्याबाबत सध्या राजकीय वर्तुळातून मोठ्या प्रमाणात चर्चा सुरु झाल्या आहेत.