महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .२२ जानेवारी । करोनाचा संसर्ग झालेल्या नागरिकांच्या लसीकरणात तीन महिन्यांचा विलंब होईल. त्यात ‘प्रिकॉशन’ डोसचाही समावेश आहे. यासंदर्भात केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव विकास शील सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना पत्र पाठवलेले आहे. ‘कृपया लक्षात घ्या – कोविड -19 संसर्गाची चाचणी पॉझिटिव्ह आढळलेल्या नागरिकांना आता बरे झाल्यानंतर तीन महिन्यांनी डोस देण्यात येईल. त्यात ‘प्रिकॉशन’ डोसचा देखील समावेश आहे’, असे केंद्राने पत्रात म्हटले आहे. “संबंधित अधिकाऱ्यांना याची दखल घ्यावी, अशी सूचना केली आहे.
करोनाचा नवीन वेरियंट ओमिक्रॉन आल्यानंतर देशात पुन्हा एकदा लसीकरणाला वेग आला आहे. या व्हायरसपासून बचाव करण्यासाठी केंद्र सरकारकडून अनेक माध्यमातून जनजागृती केली जात आहे. अशा परिस्थितीत नागरिकांच्या मनात प्रश्नही उपस्थित होत आहेत. लस मिळाल्यानंतर किंवा करोना विषाणूपासून बरे झाल्यानंतर शरीरात किती महिने प्रतिकारशक्ती म्हणजेच अँटीबॉडी अबाधित राहते? आयसीएमआरचे महासंचालक बलराम भार्गव यांनी नागरिकांच्या मनात निर्माण झालेल्या प्रश्नाबाबत माहिती दिली आहे.
करोनाबाधित रुग्ण बरा झाल्यानंतर किंवा लसीचे दोन्ही डोस घेतल्यानंतर सुमारे ९ महिने अँटीबॉडी असते. लसीपासून मिळालेल्या प्रतिकारशक्तीवर भारतात एक अभ्यास झाला आणि जागतिक स्तरावरही संशोधन झाले. या अभ्यासातून हे स्पष्ट झाले आहे की अँटीबॉडी शरीरात सुमारे ९ महिने टिकते, असे बलराम भार्गव यांनी म्हटले आहे.
दरम्यान, करोनावरील लसीकरणासाठी कोविन पोर्टलवर आता एकाच मोबाइल क्रमांकावरून ६ जणांची नोंदणी करता येणार आहे. यासाठी मोबाइल क्रमांक किंवा आधार क्रमांकाद्वारे कोविन पोर्टवर नोंदणी करता येते. यापूर्वी कोविन पोर्टलवर एकाच मोबाइल नंबर वरून किंवा आधार क्रमांकावरून फक्त ४ जणांची नोंदणी करता येत होती. आता त्यात वाढ करून ६ जणांची नोंदणी करणं शक्य होणार आहे.