महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .२२ जानेवारी । पुणे शहर आणि परिसरातील किमान तापमानात येत्या रविवारपासून (ता. २३) घट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुण्यात थंडीचा कडाका वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. यासोबतच कोल्हापूर, सोलापूर आणि सातारा-सांगलीतील तापमानात पुन्हा घट होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. येत्या दोन दिवसात पुणे शहरात किमान तापमान १० अंशाच्या खाली जाण्याची शक्यता आहे.
शहरात गेल्या तीन दिवसांपासून कमाल तापमान ३० अंशांच्या वर नोंदले जात आहे, तसेच किमान तापमानात चढ-उतार कायम आहे. त्यामुळे दिवसा उनाचे चटके बसून लागले आहेत, तर मागील दोन दिवसांपासून शहरातील अंशतः ढगाळ वातावरणदेखील कायम आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी (ता. २२) शहर आणि परिसरात आकाश अंशतः ढगाळ राहणार असून, त्यानंतर मुख्यतः निरभ्र वातावरणाचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे किमान तापमानाचा पारादेखील घसरणार असून, शहर आणि परिसरात किमान तापमान हे ९ ते १२ अंशाच्या दरम्यान नोंदले जाऊ शकते. शहरात शुक्रवारी ३१.८ अंश सेल्सिअस कमाल, तर ११.१ अंश सेल्सिअस किमान तापमान नोंदले गेले. राज्यातील बऱ्याच ठिकाणी कमाल तापमान ३० अंशांच्यावर नोंदले जात आहे. सध्या पश्चिमी चक्रावात आणि अरबी समुद्रावरून येणाऱ्या बाष्प पुरवठ्यामुळे राज्यातील काही भागांत पावसासाठी पोषक हवामान होत आहे. यामुळे पुढील दोन दिवसांत उत्तर कोकण व उत्तर मध्य महाराष्ट्राच्या काही भागात ढगाळ हवामान व हलक्या स्वरूपाच्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे.