महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .२२ जानेवारी । विमान प्रवास करताना प्रवाशांना यापुढे फक्त एकच हॅन्डबॅग घेता येणार आहे. केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या (सीआयएसएफ) विमानतळ सुरक्षा विभागाचे महानिरीक्षक विजय प्रकाश यांनी विमान कंपन्या आणि विमानतळ संचालकांना त्यासंदर्भात परिपत्रकाद्वारे कळवले आहे.
एकापेक्षा जास्त बॅगा प्रवाशांकडे असतील तर तपासणीसाठी वेळ लागतो आणि त्यामुळे इतर प्रवाशांची गैरसोय होते. इतकेच नव्हे तर सुरक्षा यंत्रणांवरही त्यामुळे ताण वाढतो असे या पत्रात म्हटले आहे. सर्व विमान कंपन्या आणि विमानतळ संचालकांनी ‘एकच हॅन्डबॅग पुरे’ असे धोरण अवलंबले पाहिजे. प्रवाशांना सुरक्षा तपासणीला जाण्यापूर्वी त्यांच्याकडे किती बॅगा आहेत याची तपासणी विमान कंपन्यांनी करावी, असे या परिपत्रकात नमूद आहे.