महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .२३ जानेवारी । महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण म्हणजेच म्हाडाकडून (Mhada) विविध पदांसाठीच्या ऑनलाईन परीक्षेसाठी तारखा जाहीर करण्यात आल्या होत्या. म्हाडाकडून अखेर परीक्षेचं प्रवेशपत्र (Hall Ticket) जाहीर करण्यात आलंय. म्हाडाकडील पदभरती ही सरळसेवा पद्धतीनं राबवली जात आहे. म्हाडामध्ये एकूण 565 पदांवर भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीनं अर्ज मागवण्यात आले होते. म्हाडाची परीक्षा यापूर्वी ऑफलाईन पद्धतीनं घेण्यात येणार होती. मात्र, परीक्षेत गैरप्रकाराचा संशय आल्यानं गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी मध्यरात्रीच्या वेळी लेखी परीक्षा रद्द करत असल्याची घोषणा केली होती. म्हाडानं त्यानंतर परीक्षा आयोजन करण्यासाठी टीसीएसची मदत घेण्याचं ठरवलं होतं.
प्रवेशपत्र जाहीर
म्हाडाच्या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना हॉलतिकीट उपलब्ध केलं आहे. विद्यार्थ्यांना हॉलतिकीट डाऊनलोड करता येणार आहे. 31 जानेवारी, 2 फेब्रुवारी, 3, 7 , 8 ,9 फेब्रुवारी या 7 दिवशी परीक्षांचं आयोजन करण्यात आलं आहे. म्हाडातील घोटाळा आणि इतर परीक्षेमुळे परीक्षा पुढे ढकलाव्या लागल्या होत्या. अखेर म्हाडानं विद्यार्थ्यांना हॉलतिकीट उपलब्ध करून दिलं.
कोणत्या पदांसाठी भरती प्रक्रिया
कार्यकारी अभियंता (स्थापत्य) 13 जागा, उप अभियंता (स्थापत्य) 13 जागा, मिळकत व्यवस्थापक/ प्रशासकीय अधिकारी 02 जागा, सहायक अभियंता (स्थापत्य) 30 जागा, सहायक विधी सल्लागार 2 जागा, कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) 119 जागा , कनिष्ठ वास्तूशास्त्रज्ञ सहायक 6 जागा, स्थापत्य अभियांत्रिकी सहायक 44 जागा, सहायक 14 जागा, वरिष्ठ लिपीक 73 जागा, कनिष्ठ लिपीक- टंकलेखक 207 जागा, लघूटंकलेखक 20 जागा, भूमापक 11 जागा आणि अनुरेखक 07 अशा एकूण 565 जागांवर भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे.
हॉल तिकीट कुठं मिळणार?
म्हाडानं सरळसेवा भरती परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना हॉलतिकीट उपलब्ध करुन दिलं आहे. https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/31659/75245/login.html या वेबसाईटवरुन विद्यार्थ्यांना हॉल तिकीट डाऊनलोड करता येणार आहे. 31 जानेवारी, 2 फेब्रुवारी, 3, 7 , 8 ,9 फेब्रुवारी या 7 दिवशी परीक्षांचं आयोजन करण्यात येणार आहे.