महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . ३१ जानेवारी । राज्यात रविवारी सर्वात कमी किमान तापमानाची (Lowest temperature) नोंद जळगाव याठिकाणी करण्यात आली आहे. काल येथील तापमान 5 अंश सेल्सिअसवर पोहोचलं होतं. जळगावसोबतच उत्तर महाराष्ट्रात अनेक ठिकाणी तापमानाचा पारा घसरला (Temperature drop in maharashtra) होता. त्यानंतर आजही उत्तर महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांत थंडीची लाट (Cold wave) कायम राहणार असून पुढील 24 तास अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत. आज एकूण 9 जिल्ह्यांना थंडीचा येलो अलर्ट (yellow alert) जारी केला आहे.
हवामान खात्याने आज नाशिकसह, औरंगाबाद, नंदुरबार, धुळे, जळगाव, जालना, परभणी, हिंगोली आणि नांदेड या नऊ जिल्ह्यांत थंडीचा येलो अलर्ट जारी केला आहे. आस सकाळपासूनच संबंधित जिल्ह्यात थंडगार वारे वाहत आहे. मध्य रात्री आणि पहाटे याठिकाणी धुक्यासह कडाक्याची थंडी पडण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. दरम्यान संबंधित जिल्ह्यात बहुतांशी ठिकाणी किमान तापमान एक अंकी नोंदण्याची शक्यता आहे.
आज सकाळी पुणे जिल्ह्यात सर्वात कमी तापमान शिरूर याठिकाणी नोंदलं असून येथील तापमान 9.7 अंश सेल्सिअस एवढं नोंदलं गेलं आहे. त्यापाठोपाठ हवेली (10.1), पाषाण (10.1), शिवाजीनगर (10.3), माळीण (10.4), एनडीए (10.8) आणि राजगुरूनगर याठिकाणी 10.9 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली आहे. पुणे जिल्ह्यात उर्वरित ठिकाणी तापमानाचा पारा 11 ते 18 अंश सेल्सिअसच्या दरम्यान नोंदला गेला आहे.
दुसरीकडे, येत्या 48 तासात उत्तर प्रदेशातील तेराई पट्ट्यासह बिहारमध्ये अनेक ठिकाणी पहाटे आणि रात्रीच्या वेळी दाट धुके पडण्याची शक्यता आहे. तर हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, पंजाब आणि हरियाणा या राज्यात पुढील चोवीस तासांत थंडीच्या लाटेसह दाट धुकं पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे हवामान खात्याने संबंधित राज्यातील लोकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.