![]()
महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . १ फेब्रुवारी । शहरातील हडपसर भागात सोमवारी रात्री तीन वेगवेगळ्या ठिकाणी आग लागण्याच्या घटना घडल्या. या तिन्ही ठिकाणी शॉटसर्किटमुळं आग लागल्याचा अंदाज आहे. सुदैवानं यात कोणतीही जीवितहानी झाल्याचं वृत्त नाही.
हडपसर रामटेकडी येथे रात्री बारा वाजण्याच्या सुमारास एका साबणाच्या कंपनीला मोठी आग लागली. काही वेळातच आगीनं रौद्ररूप धारण केलं. घटनास्थळी पोहोचलेल्या हडपसर अग्निशमन दलाच्या जवानांनी अंधारात जीव धोक्यात घालून आग आटोक्यात आणली. तब्बल तीन तासानं ही आग पूर्णपणे नियंत्रणात आली. त्याचवेळी हडपसर गावातील भाजी मंडईमधे एका भाजीच्या दुकानानं पेट घेतला. ही आग छोटी असल्यानं जवान तिथं पोहोचले आणि त्यांनी काही वेळेतच आग आटोक्यात आणली. ही आग विझते न विझते तोच रामटेकडी येथील साबणाच्या कंपनीत पुन्हा आगीचा भडका उडाल्यानं जवानांनी तिथं धाव घेतली. अग्निशमन दलाच्या जवानांनी तिथं कुलिंगचं काम हाती घेतलं. हे काम संपवत असतानाच उंड्री चौक इथं रात्री दोन वाजण्याच्या सुमारास डॉमिनोज पिझ्झा शेजारी एसी डक्टनं पेट घेतला. घटनास्थळी व्यावसायिक वापरासाठीचे दहा सिलिंडर होते. नागरिकांनी व जवानांनी सिलिंडर बाजूला काढून घेतल्याने मोठा अनर्थ टळला. कोंढवा बुद्रूक अग्निशमन केंद्राच्या जवानांनी दीड तासांच्या प्रयत्नांनंतर ही आग नियंत्रणात आणली. तिन्ही दुर्घटना शॉर्टसर्किटमुळे झाल्याचा अंदाज अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी वर्तवला आहे.