महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . २ फेब्रुवारी । सोशल मीडियावर ‘थोडा रूको जरा,सबर करो’ या डॉयलॉगमुळे फेमस झालेला हिंदुस्तानी भाऊ उर्फ विकास फाटक याचे ग्रह आता उलटे फिरू लागले आहेत. बेकायदेशीर आंदोलन तसेच हिंसक कृत्य करण्याच्या आरोपाखाली नागपूर पोलिसांनी त्याच्या विरुद्ध दोन वेगवेगळे गुन्हे दाखल केले. मुंबई पोलिसांची चौकशी संपताच त्याला अटक करण्यात येईल, असे पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी सांगितले.
दहावी-बारावीच्या ऑफलाइन परीक्षा पद्धती संबंधाने सोशल मीडियावर चिथावणीखोर मेसेज हिंदुस्थानी भाऊ यांनी पाठविले. मुंबई, नागपूरसह राज्यातील अनेक ठिकाणी विद्यार्थ्यांना रस्त्यावर उतरून बेकायदा आंदोलन करण्यास प्रवृत्त केले. या कृतीमुळे जागोजागी कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती निर्माण झाली. अनेक ठिकाणी तोडफोडही झाली. या पार्श्वभूमीवर, मुंबई पोलिसांनी हिदुस्थांनी भाऊला अटक केली.
दरम्यान, ज्या पद्धतीने सोमवारी चिथावणी देऊन आंदोलन करण्यात आले. त्याचप्रमाणे पुन्हा पुढच्या काही तासात असेच उलट-सुलट मेसेज पाठवून अफवा पसरवल्या जाऊ शकतात, अशी माहिती पोलिसांकडे आली आहे. या पार्श्वभूमीवर, पोलिस आयुक्तांनी आज विद्यार्थ्यांसोबत नागरिकांनाही आवाहन केले आहे.अफवांना बळी पडू नका, सतर्कता बाळगा, कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती कायम राहील, त्याचप्रमाणे कोणत्याही प्रकारची हिंसक घटना कुठे घडणार नाही, याची काळजी घेण्याचे आवाहन त्यांनी केले. सोमवारी नागपुरात करण्यात आलेल्या आंदोलनाची सुरुवात इंस्टाग्रामवरील मेसेजच्या माध्यमातून झाली.
आंदोलनाच्या संबंधाने हिंसक घटना घडल्यास विद्यार्थ्यावर गुन्हा दाखल होईल. त्यामुळे त्याला भविष्यात अनेक अडचणी येऊ शकतात. त्याचप्रमाणे पासपोर्ट तयार करून घेण्यास अडचण आल्याने विदेशात शिक्षण, नोकरीसाठी जाण्यास अडथळा निर्माण होऊ शकतो. त्यामुळे विद्यार्थी आणि पालकांनी कोणत्याही अफवांना बळी पडू नये, असे आवाहन पोलीस आयुक्तांनी केले आहे.