महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . २ फेब्रुवारी । संतोष परब हल्लाप्रकरणी भाजप आमदार नीतेश राणे यांचा जामीन अर्ज जिल्हा व सत्र न्यायालयाने आज फेटाळला. राणे यांची धावाधाव सुरूच असून जामिनासाठी त्यांनी पुन्हा उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. दरम्यान, निकालानंतर नोटीस, कागदोपत्री पूर्तता करण्यासाठी पोलिसांनी त्यांची गाडी अडवून ठेवल्यानंतर माजी खासदार नीलेश राणे आणि पोलिसांची बाचाबाची झाली. यावेळी कोर्ट परिसरात भाजपच्या कार्यकर्त्यांनी एकच गोंधळ घातला.
सर्वोच्च न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळल्यानंतर आमदार नीतेश राणे यांनी जिल्हा न्यायालयाकडे केलेला जामीन अर्ज जिल्हा न्यायाधीश व अतिरिक्त सत्र न्यायाधीश आर. बी. रोटे यांनी फेटाळून लावला आहे. त्यांच्यावर अटकेची टांगती तलवार कायम आहे. राणे यांचा जामीन अर्ज फेटाळल्याने ते पुन्हा उच्च न्यायालयात जाणार
आहेत.
न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे शरण या, त्यानंतर जामीन अर्ज करा
राणे यांनी आधी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे शरण यावे आणि त्यानंतर जामीन अर्ज करावा, असे मत कोर्टाने नोंदवले असल्याची माहिती सरकारी वकिलांकडून देण्यात आली. नीतेश राणे हे संशयित आरोपी असून ते सुनावणीवेळी कोर्टात बसायचे. त्यांनी कोर्टात मी शरण यायला तयार आहे, असेही सांगितले. त्यावर बराच युक्तिवाद झाला. न्यायालयीन दाखले दिले गेले. त्यानंतर नीतेश राणेंना एकतर जामीन घेऊन बाहेर जाऊ द्यायला हवे होते नाहीतर त्यांना परवानगी घेऊन बाहेर जाऊ द्यायला हवे होते. मात्र आमच्या युक्तिवादाप्रमाणे कोणतीही ऑर्डर झाली नाही, असे वकील घरत यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
मागच्या दाराने जामीन दिल्याचा प्रकार होईल
कोर्टाची ऑर्डर येईपर्यंत सर्वांनी थांबणे गरजेचे होते, म्हणून पोलिसांनी नीतेश राणेंना थांबवले. त्यावर लेखी ऑर्डर होणे गरजेचे होती, मात्र नीतेश राणे यांनी शरणागतीबाबत कोणताही लेखी अर्ज न दिल्याने कोर्टाने तशी ऑर्डर देण्यास नकार दिल्याचीही माहिती वकिलांनी दिली. राणे यांना हा मागच्या दाराने जामीन दिल्याचा प्रकार होईल असे मत नोंदवले असल्याचे वकील प्रदीप घरत यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले.