एका तासात बिजींगवरून न्यूयॉर्कला पोहचवणार हे विमान

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . ३ फेब्रुवारी । चीनने रॉकेटच्या वेगाने उडणारे विमान तयार केले आहे. हे विमान एका तासात 7 हजार किलोमीटरचं अंतर पार करू शकतं. या विमानाच्या चाचण्यांना पुढच्या वर्षापासून सुरुवात होणार आहे. जगाच्या एका कोपऱ्यात असलेल्या बिजिंगपासून अमेरिकेतील न्यूयॉर्कपर्यंतचं अंतर हे विमान फक्त 1 तासात गाठू शकतं असा दावा करण्यात आला आहे. 2024 पर्यंत हे विमान उड्डाणासाठी सज्ज असेल असं शास्त्रज्ञांनी म्हटलं आहे. स्पेस ट्रान्सपोर्टेशन या कंपनीने हे विमान तयार केलं आहे.

स्पेस ट्रान्सपोर्टेशन कंपनीने हे विमान तयार केलं असून या विमानाचा एक व्हिडीओ त्यांनी शेअर केला आहे. रॉकेट हवेमध्ये जसं झेपावतं, त्याच पद्धतीने हे विमान हवेत झेपावत असल्याचं या व्हिडीओत दाखवण्यात आलं आहे. अंतराळात सोडण्यात येणारी अंतराळयाने काही अंतर पार केल्यानंतर त्याला वेग देणारी रॉकेट यानापासून वेगळी होत असतात. चिनी कंपनीने तयार केलेल्या विमानामध्येही तशीच यंत्रणा असणार आहे. सदर विमान हे पंख असलेलं रॉकेट असल्याचं कंपनीने म्हटलंय. या विमानाने एका ठिकाणापासून दुसऱ्या ठिकाणापर्यंत उपग्रह वाहून नेणाऱ्या रॉकेटच्या तुलनेत कमी खर्चात पोहोचता येईल असा दावाही या कंपनीने केला आहे. चीन सातत्याने हवाई क्षेत्रात नवनवे प्रयोग करत असून त्यासाठी बराच पैसा खर्च केला जात आहे. गेल्या वर्षी चीनने एका विमानाची घोषणा केली होती जे जगाच्या कुठल्याही कोपऱ्यातून कुठेही 10 माणसांना एका तासात पोहचवू शकेल. हे विमान बोईंग 737 पेक्षा मोठे असून ते 148 फूट उंच असणार आहे. या विमानाच्या वरच्या बाजूला दोन मोठाली इंजिन बसवण्यात आली असून ती या विमानाला वेगवान प्रवासासाठी मदत करणारी असतील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *