महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . ३ फेब्रुवारी । संतोष परब हल्लाप्रकरणी पोलिसांनी भाजप आमदार नितेश राणे यांची गुरुवारी कसून चौकशी केली. नितेश राणे यांना बुधवारी दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. त्यामुळे नितेश राणे यांना सावंतवाडी कारागृहात ठेवण्यात आले होते. आज सकाळी नितेश राणे (Nitesh Rane) यांना चौकशीसाठी कणकवली पोलीस ठाण्यात आणण्यात आले. सकाळी साधारण १०.३० वाजता नितेश राणे यांच्या चौकशीला सुरुवात झाली. यावेळी पोलिसांनी नितेश राणे आणि त्यांचे स्वीय सहाय्यक राकेश परब यांना समोरासमोर बसवून चौकशी केल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. अखेर दुपारी ३.१५ वाजण्याच्या सुमारास नितेश राणे कणकवली पोलीस ठाण्यातून बाहेर पडले. त्यानंतर नितेश राणे यांना घेऊन पोलिसांचा ताफा पुन्हा रवाना झाला. नितेश राणे यांना आजही सावंतवाडी कारागृहात मुक्काम करावा लागणार आहे. तत्पूर्वी नितेश राणे यांची वैद्यकीय चाचणी होण्याची शक्यता आहे.