IT sector Jobs: IT कंपन्यांमध्ये होणार मेगाभरती, ‘या’ कंपन्यांमध्ये..

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . ४ फेब्रुवारी । माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील (आयटी) आघाडीच्या पाच कंपन्यांनी आगामी आर्थिक वर्षात (२०२२-२३) १.८२ लाख नवोदितांना नोकरी देण्याचे उद्दिष्ट निर्धारित केले आहे. ‘डिजिटायझेशन’मुळे ‘आयटी’ क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर रोजगारांची निर्मिती होत आहे. ‘टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस’ (टीसीएस), एचसीएल टेक, विप्रो, टेक महिंद्र आणि इन्फोसिस या कंपन्यांनी डिसेंबर २०२१अखेर संपलेल्या तिमाहीत चांगला महसूल प्राप्त केला आहे.

गेल्या वर्षी याच कंपन्यांनी ८० हजार नवोदितांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या होत्या. त्या तुलनेत आगामी आर्थिक वर्षात १२० टक्के अधिक नोकऱ्यांची निर्मिती करण्यात येणार आहे.

आयटी कंपन्यांमधून नोकरी सोडण्याचे प्रमाण वाढल्याने नवोदितांना सर्वाधिक प्राधान्य देण्यात येत आहे. जानेवारी ते डिसेंबर २०२१ या कालावधीत या पाच कंपन्यांनी २.३० लाख नवोदितांना नोकऱ्या दिल्या आहेत. याच कालावधीत या कंपन्यांच्या ३५ हजार कर्मचाऱ्यांनी नोकऱ्यांना अलविदा केले. आयटी क्षेत्रातील देशातील सर्वांत मोठी कंपनी ‘टीसीएस’ने यंदा ७८ हजार नव्या नोकऱ्या देणार असल्याचे जाहीर केले आहे. गेल्या वर्षी कंपनीने ४० हजार कर्मचाऱ्यांची भरती केली.

आयटी क्षेत्रातील आघाडीच्या ‘इन्फोसिस’ने गेल्या वर्षी २१ हजार जणांना रोजगार दिला. चालू वर्षात कंपनी ५५ हजार रोजगारांची निर्मिती करणार आहे. याचा अर्थ यंदा दुपटीहून अधिक रोजगार उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. ‘विप्रो’ने यंदा १७,५०० नवे रोजगार देण्याची घोषणा केली आहे. गेल्या वर्षी कंपनीने केवळ नऊ हजार नोकऱ्या उपलब्ध केल्या होत्या.

‘एचसीएल टेक’तर्फे आगामी आर्थिक वर्षात २२ हजार नव्या नोकऱ्यांची निर्मिती करण्यात येणार आहे. गेल्या वर्षी कंपनीने १२ हजार नोकऱ्या दिल्या होत्या. ‘टेक महिंद्र’ने गेल्या वर्षी उपलब्ध केलेल्या नोकऱ्यांचा तपशील उपलब्ध नाही. मात्र, यंदा कंपनी १० हजार नोकऱ्यांची निर्मिती करणार आहे. डिसेंबर २०२१अखेर पाच आयटी कंपन्यांनी २.३० लाख कर्मचाऱ्यांची भरती केली.

आयटी कंपन्यांची नोकरभरती

(जानेवारी ते डिसेंबर २०२१)

कंपनी कर्मचारी

टीसीएस ८७,७२५

इन्फोसिस ४२,७५५

विप्रो ४१,३६३

एचसीएल टेक ३८,०९५

टेक महिंद्र २३,९७६

एकूण २,३३,९१४

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *