महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . ४ फेब्रुवारी । महाराष्ट्रातील सुपरमार्केट आणि जनरल स्टोअर्समध्ये वाईन विक्रीला राज्य सरकारने परवानगी (wine sale in supermarket) दिली. या निर्णयावरुन राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले. भाजपसह अनेकांनी हा निर्णय चुकीचा असल्याचं म्हटलं. तर याच निर्णयावर ह. भ. प. बंडातात्या कराडकर (Bandatatya Karadkar) यांनी नेत्यांवर टीका केली आणि त्यावरुन चांगलाच गदारोळ झाला. नेत्यांची मुलं दारू पितात असं वक्तव्य बंडातात्या यांनी केलं होतं. त्यानंतर आता बंडातात्या कराडकर यांनी आपलं विधान मागे घेत माफी मागितली आहे.
बंडातात्या कराडकर म्हणाले, “समजा ज्यांनी माझ्याविरोधात आक्षेप घेतला आहे त्यांचयासोबत फोनवर बोललो आहे मी. जे वक्तव्य केलं त्यांच्या भावना दुखावल्या असतील तर मी माफी मागायला तयार आहे. माफी मागायला कमीपणा कसला. तुम्ही कशासाठी विषय वाढवता.”
बंडातात्या कराडकर यांनी केलेल्या विधानानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आक्रमक होत आंदोलन केलं. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी बारामती शहरातील भिगवन चौकात बंडातात्या कराडकर यांच्या प्रतिमेला जोडा मारो आंदोलन केले. सातारा येथे बंडातात्या कराडकर यांनी सुप्रिया सुळे, यांच्या बद्दल आक्षेपार्ह विधान केलं होतं, त्याच्या विरोधात बारामतीत राष्ट्रवादी आक्रमक झाली. कार्यकर्त्यांनी भिगवन चौकामध्ये गुरुवारी हे आंदोलन केले. यावेळी बंडातात्या कराडकर यांच्या विरोधात घोषणाबाजी देखील करण्यात आली.
दरम्यान या प्रकरणी बंडातात्या कराडकरांवर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बेकायदेशीर आंदोलन करणे, कोरोनाचे नियम न पाळता आंदोलन करणे, मास्क बाबत वेगळी चिथावणी देणे या कलमांखाली बंडातात्या कराडकर यांच्यासह इतर कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच वादग्रस्त भाषण केल्याचीही सातारा शहर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.
राज्यातील नेते आणि त्यांची मुले दारू पितात. काही दारू पिऊन रस्त्यावर पडत असतात याचे पुरावे सुद्धा आहेत. इतकंच नाही तर सुप्रिया सुळे आणि पंकजा मुंडे यांच्या बाबतही बंडातात्या कराडकर यांनी आक्षेपार्ह विधान केलं होतं.