महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि ४ फेब्रुवारी । वेस्ट इंडिजमध्ये सुरू असलेल्या अंडर-19 विश्वचषक 2022 (U19 World Cup 2022) स्पर्धेतील अंतिम सामन्यात भारतीय संघ (U19 Team India) इंग्लंडशी भिडणार आहे. या स्पर्धेच्या उपांत्य फेरीत भारताचा कर्णधार यश धुलच्या शानदार शतकाच्या जोरावर भारतानं ऑस्ट्रेलियाचा 96 धावांनी पराभव केला. भारतीय संघानं सलग चौथ्यांदा अंडर-19 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारलीय. भारत आणि इंग्लंडविरुद्ध सामना कधी, कुठे आणि कसा पाहता येणार? याबद्दल सविस्तर जाणून घेऊयात.
भारताचा अंडर-19 विश्वचषकातील प्रवास
भारताच्या आयर्लंडविरुद्धच्या दुसऱ्या सामन्यापूर्वी भारताचे सहा खेळाडू आयसोलेशनमध्ये गेले होते. यात कर्णधार यश धुल, उपकर्णधार शेख रशीद, सिद्धार्थ यादव, आराध्या यादव आणि मानव पारीख आरटीपीसीआर चाचणीत पॉझिटिव्ह आढळले. युगांडाविरुद्धच्या शेवटच्या साखळी सामन्यातही खेळले नव्हते. मात्र, संघाच्या बेंच स्ट्रेंथच्या जोरावर भारतानं हे सामने सहज जिंकून गटातील अव्वल संघ म्हणून उपांत्यपूर्व फेरी गाठली. यादरम्यान धुळच्या अनुपस्थितीत निशांत सिंधूनं संघाची कमान सांभाळली होती.
कधी, कुठे आणि कसा पाहायचा सामना?
भारत आणि इंग्लंड यांच्यातील अंडर-19 विश्वचषकाचा अंतिम सामना (IND vs ENG) सर व्हिव्हियन रिचर्ड्स क्रिकेट मैदान, नॉर्थ साउंड, अँटिग्वा येथे होणार आहे. हा सामना स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या विविध भाषिक वाहिन्यांवर प्रसारित केला जाईल. या सामन्याचे ऑनलाइन स्ट्रिमिंग डिज्नी प्लस हॉटस्टार अॅपवर पाहता येईल. यासाठी तुम्हाला या अॅपचे सदस्यत्व घ्यावे लागेल.
अंडर-19 विश्वचषकामध्ये दोन्ही संघाची कामगिरी
अंडर-19 विश्वचषकात भारत आणि इंग्लंड या दोन्ही संघानं एकही सामना गमवला नाही. या दोन्ही संघांनी आपापल्या गटातील सर्व 3 सामने एकतर्फी पद्धतीने जिंकले. त्यानंतर उपांत्यपूर्व आणि उपांत्य फेरीत दोन्ही संघानं चांगली कामगिरी करत अंतिम फेरीत धडक दिलीय. यामुळं भारत आणि इंग्लंड यांच्यात होणारा अंतिम सामना रोमहर्षक होण्याची शक्यता आहे.