ज्येष्ठ कीर्तनकार बंडातात्या कराडकर यांना अटक

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि ४ फेब्रुवारी । साताऱ्यात बंडातात्या कराडकर यांच्या नेतृत्वाखाली गुरुवारी व्यसनमुक्ती संघटनेचे दंडवत आणि दंडूका असं आंदोलन केले. यावेळी विनापरवाना जमाव जमवून आंदोलन केल्याप्रकरणी व महिला नेत्यांबद्दल केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याप्रकरणी बंडातात्या कराडकर यांना अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. सातारा पोलिसांनी त्यांना पिपरंद (ता. फलटण) राष्ट्रसंत गुरुवर्य दीक्षित आश्रमातून ताब्यात घेतलं होतं. त्यानंतर त्यांना साताऱ्यात आणण्यात आलं.

आंदोलनादरम्यान करोना नियमाचं उल्लंघन केल्याप्रकरणी शहर पोलिसांनी बंडातात्या कराडकर यांच्यासह १२५ जणावर विविध कलमान्वये सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. विनापरवाना जमाव जमवून आंदोलन केल्याप्रकरणीही गुन्हा दाखल करण्यात आला. आंदोलनादरम्यान बोलताना बंडातात्या कराडकर यांनी राज्यातील नेते आणि त्यांची मुले रस्त्यावर दारू पिऊन पडत असतात आणि याचे पुरावेदेखील असल्याचं प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हटलं होतं. यावेळी त्यांनी पंकजा मुंडे, सुप्रिया सुळे यांचा उल्लेख केला होता.

आंदोलनादरम्यान जिल्हाधिकारी कार्यालयासमोर समोर प्रचंड गर्दी जमली होती. त्या सर्वांनी करोना नियमाचं उल्लंघन केलं. यामुळे पोलिसांनी प्रकाश सदाशिव जंत्रे उर्फ बंडातात्या कराडकर, विकास शंकर जवळे, मनोज निंबाळकर यांच्यासह १२५ जणांवर गुन्हा दाखल केला होता.

पोलिसांनी त्यांना सातारा शहर पोलिस ठाण्यात आणलं आहे. यावेळी आंदोलनाची आणि वक्तव्याची चौकशी करण्यात येणार आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी शहर पोलिस ठाणे परिसरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *