महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . ४ फेब्रुवारी । विकास फाटक उर्फ हिंदुस्थानी भाऊची पोलीस कोठडी एक दिवसाने वाढवली आहे. विकास फाटकवर दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांना भडकवल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणातील दुसरा आरोपी इकरार खान याला न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे.
मुंबईसह अनेक ठिकाणी शेकडो विद्यार्थी दहावी-बारावीच्या परीक्षा ऑनलाईन घ्या या मागणीसाठी रस्त्यावर उतरले होते. हिंदुस्थानी भाऊने या विद्यार्थ्यांना भडवल्याचे स्पष्ट झाल्यानंतर त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर त्याला मुंबईच्या धारावी पोलिसांनी अटक केली. पाठकला 4 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. त्यानंतर आज पुन्हा एक दिवसाने पाठकच्या कोठडीत वाढ करण्यात आली आहे.
दरम्यान हिंदुस्थानी भाऊने रस्त्यावर उतरलेल्या विद्यार्थांची जबाबदारी मी का घेऊ असा सवाल केला होता. विद्यार्थी आंदोलन करत आहेत, ही जबाबदारी राज्य सरकारची असल्याचेही हिंदुस्थानी भाऊने एबीपी माझाशी बोलताना काल सांगितले होते. गेल्या तीन महिन्यांपासून दहावी-बारावीचे विद्यार्थी डिप्रेशनमध्ये होते, अनेकांनी जीव देण्याची इच्छा व्यक्त केली, त्यामुळेच रस्त्यावर उतरून आंदोलन करावे, असे आपण आवाहन केल्याचे त्याने म्हटले होते.
सोशल मीडिया सेलिब्रिटी हिंदुस्थानी भाऊचा व्हिडीओ विद्यार्थ्यांच्या या आंदोलनामागे असल्याचे बोलले जात आहे. चार दिवसांपूर्वी हिंदुस्थानी भाऊचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. परीक्षा ऑफलाईन न घेता ऑनलाईन घ्याव्यात. शक्य झाले, तर रद्द करा पण विद्यार्थ्यांच्या जिवाशी खेळू नका. जर निर्णय बदलला नाही तर रस्त्यावर उतरुन आंदोलन करु, असे व्हिडीओत हिंदुस्थान भाऊने म्हटले होते.