महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . ४ फेब्रुवारी । कोरोना व्हायरसने मागील दोन वर्षांपासून संपूर्ण जगभरात हाहाकार माजवला आहे. या व्हायरसमुळे अनेकांनी आपला प्राण गमावला. कोरोनापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी मास्कचा वापर करण्याचा सल्ला वारंवार दिला जातो. एकप्रकारे, मास्क आपल्या दैनंदिन जीवनातील आवश्यक वस्तूंपैकी एक झाला आहे. आपल्याला घराबाहेर पडण्यावेळी मास्क लावणे अनिवार्य आहे. तथापि काही लोकांना जास्तवेळ मास्क लावल्यामुळे काही शारीरिक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. त्याचबरोबर काहीही खात-पित असताना मास्क काढावेच लागतो. याच गोष्टी लक्षात ठेवून कोरियाच्या एका कंपनीने अनोखा मास्क तयार केला आहे. हा मास्क आपल्या डिझाइनमुळे सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.
हा अनोखा मास्क दक्षिण कोरियामधील एटमन या कंपनीने तयार केला आहे. या मास्कचे वैशिष्ट्य म्हणजे हा मास्क केवळ नाक झाकतो, तर आपले तोंड उघडे राहते. कोस्क (Kosk) असे याचे नाव ठेवण्यात आले आहे. तथापि, अर्धवट वाटणारा हा मास्क आपण पूर्ण देखील घालू शकतो किंवा फोल्ड करून फक्त नाकापुरता याचा वापर करू शकतो.
या मास्कच्या अनोख्या डिझाइनमुळे खाण्या-पिण्याच्या वेळी हा मास्क अत्यंत फायदेशीर ठरतो. श्वसनासंबंधी समस्या ज्यांना आहे त्यांच्यासाठी हा मास्क उपयुक्त आहे. ‘कोस्क’ असे नाव या मास्कला देण्यात आले आहे. कारण ‘कोस्क’ हा कोरियामध्ये नाकासाठी वापरला जाणारा ‘को’ आणि मास्क या शब्दाचा संयोग आहे. या मास्कला केएफ८० टॅग देण्यात आला आहे. यामध्ये के हे अक्षर कोरियन आणि एफ हे अक्षर फिल्टर या शब्दासाठी वापरण्यात आले आहे. हे मास्क ०.३ मायक्रॉन कण ८०% कार्यक्षमतेने फिल्टर करू शकते, असा दावा या कंपनीने केला आहे.