![]()
महाराष्ट्र 24 | विशेष प्रतिनिधी | दि.१९ जानेवारी | पुणे विमानतळावर शनिवारी रात्री घडलेला प्रकार म्हणजे “उड्डाण” या शब्दालाच काळे फासलेले प्रकरण म्हणावे लागेल. रात्री अकरा वाजून पंचावन्न मिनिटांनी अहमदाबादकडे झेपावणारे विमान प्रवाशांच्या कल्पनेतच उडाले, प्रत्यक्षात मात्र ते कुठे होते, हे विमान कंपनीलाच ठाऊक! चेक-इन झाले, बोर्डिंग पास हातात आले, प्रवासी गेटवर पोहोचले; पण विमानाने मात्र येण्याचे सौजन्यही दाखवले नाही. सुरुवातीला ‘थोडा उशीर’ हा गुळगुळीत शब्द, नंतर ‘तांत्रिक कारण’ आणि शेवटी कुठलाही खुलासा न करता ‘रद्द’ असा आदेश! हा सारा प्रकार पाहता, प्रवाशांनी तिकीट काढले होते प्रवासासाठी की संयम चाचणीसाठी, असा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही.
एअर आकस या खासगी विमान कंपनीने दाखवलेली ही कार्यपद्धती म्हणजे “आम्ही सांगू, तेवढेच तुम्ही ऐकायचे” अशा थाटातली. विमान आलेच नाही, हे सांगायला कंपनीला तब्बल तास लागले. तोपर्यंत प्रवासी रात्रीच्या थंडीत, उपाशीपोटी, आशेवर उभे. काहींना दुसऱ्या दिवशी महत्त्वाच्या बैठका, काहींना वैद्यकीय कारणे, तर काहींना लग्नसमारंभ गाठायचे होते. पण विमान कंपनीच्या दृष्टीने हे सारे गौण! प्रवाशांनी आवाज उठवला, तेव्हा त्याला ‘गोंधळ’ असे लेबल लावण्यात आले. प्रश्न विचारणे हा गुन्हा ठरतो का, असा सवाल येथे उपस्थित होतो.
अखेरीस पर्यायी विमानाची घोषणा झाली आणि रविवारी सकाळी तब्बल नऊ तासांनंतर प्रवास सुरू झाला. म्हणजे पुणे ते अहमदाबाद हे अंतर विमानाने एका तासाचे, पण व्यवस्थापनाच्या हलगर्जीपणामुळे नऊ तासांचे! ही वेळ प्रवाशांच्या आयुष्यातून कोण भरून देणार? समाजमाध्यमांवर संताप उसळला, अनुभव कथन झाले; पण अशा पोस्ट्स म्हणजे जखमेवर मीठ चोळण्यापुरतेच. कारण विमान कंपन्यांना प्रवाशांचा संताप हा केवळ ‘डिजिटल आवाज’ वाटतो, प्रत्यक्ष जबाबदारीची जाणीव मात्र क्वचितच.
विमान कंपनीने नंतर निवेदन काढून ‘तांत्रिक बिघाड’ आणि ‘वैमानिकाची ड्यूटी’ यांचा पाढा वाचला. प्रवाशांच्या राहण्याची व जेवणाची सोय केली, असे सांगण्यात आले. पण प्रश्न असा आहे की, प्रवाशांनी पैसे दिले होते प्रवासासाठी; हॉटेल आणि जेवणासाठी नव्हे! नियोजनाचा अभाव, वेळेचे नियमन न करणे आणि स्पष्ट संवादाचा अभाव — या साऱ्याची किंमत प्रवाशांनी मोजायची आणि कंपनीने निवेदन देऊन मोकळे व्हायचे?— “विमान उडतं आकाशात, पण जबाबदारी मात्र जमिनीवरच का आपटते?”
