Weather Update: उत्तर भारतात हिमवर्षाव ; येत्या 2 दिवसांत राज्य पुन्हा गारठणार

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . ४ फेब्रुवारी ।गेल्या 15 दिवसांपासून अफगाणिस्तानातून वाहणाऱ्या पश्चिमी चक्रावातामुळे उत्तर भारत आणि महाराष्ट्रात थंडीचा कडाका (Cold weather) वाढला आहे. 2 फेब्रुवारी रोजी देशात चक्रवात धडकल्यामुळे उत्तर भारतात पाऊस, गारपीट, धुके आणि थंडी असं संमिश्र वातावरण पाहायला मिळत आहे. गुरुवारी राज्यात काही अंशी तापमानाचा पारा (Temperature in Maharashtra) वाढला होता. त्यानंतर आजही तापमानात किंचितशी वाढ नोंदली आहे. पण येत्या दोन दिवसांत पुन्हा एकदा राज्य गारठणार असल्याची माहिती हवामान विभागाकडून (IMD) देण्यात आली आहे.

काल भंडारा आणि नागपूर जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह अगदी हलक्या स्वरुपाच्या सरी कोसळल्या आहेत. त्यामुळे परिसरात गारठा वाढला होता. तसेच सध्या जम्मू काश्मीरसह उत्तरेकडील पर्वतीय राज्यामध्ये पश्चिमी चक्रावात, हिमवर्षाव पाऊसाचा कहर सुरू आहे. याचा एकंदरित परिणाम म्हणून विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि कोकणात किमान तापमानात घसरण होऊन गारठा वाढण्याची शक्यता आहे. तसेच उत्तर महाराष्ट्रात विजांच्या कडकडाटासह गारपिटीचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

आज सोलापुरात 14, पुणे 13.1, सातारा 13.1, नाशिक 12.3, नांदेड 13.8, सांगली 13.4, मालेगाव 13.8, चिकलठाणा 11.7, माथेरान 14.6 आणि उस्मानाबाद जिल्ह्यात 13.6 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली आहे. येत्या दोन दिवसांत पुन्हा एकदा विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि कोकणात गारठा वाढण्याची शक्यता आहे. बुधवार आणि गुरुवारी राज्यात थंडीचे प्रमाण कमी झाले असले तरी गुरुवारी सायंकाळनंतर थंडगार वारे वाहत होते.

दुसरीकडे, अरबी समुद्रातून वाहणारे वारे आणि बंगालच्या उपसागरातून वाहणारे वारे झारखंड परिसरात एकमेकांना धडकत आहेत. त्यामुळे येत्या काळात झारखंडसह महाराष्ट्रातील विदर्भात विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. तर तुरळक ठिकाणी गारपिटीचा अंदाजही व्यक्त करण्यात आला आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *