महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . ७ फेब्रुवारी । आपल्या दैवी आवाजाने तब्बल चार पिढ्यांवर गारुड निर्माण करणाऱ्या ज्येष्ठ गायिका लता मंगेशकर (lata mangeshkar) यांचं काल सकाळी दीर्घ आजाराने निधन झालं. त्यामुळे राज्य सरकारने (maharashtra government) दुखवटा जाहीर केला आहे. त्यानिमित्ताने आज (7 फेब्रुवारी) रोजी राज्यात सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे. केंद्र सरकारपाठोपाठ राज्य सरकारनेही राजकीय दुखवटा जाहीर केल्याने दोन दिवस सर्व सरकारी कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत.
राज्य सरकारने यासंदर्भात काढण्यात आलेल्या अधिसूचनेत म्हटले आहे की, आज रविवार 6 फेब्रुवारी रोजी भारतरत्न लता मंगेशकर यांचे दुःखद निधन झाले असून त्यांच्या निधनामुळे संगीत आणि कला विश्वाची अपरिमित हानी झाली आहे. या महान गायिकेला श्रद्धांजली वाहण्यासाठी, परक्राम्य संलेख अधिनियम, 1881( सन 1981चाअधिनियम 26 ) च्या कलम 25 खाली महाराष्ट्र शासनास सोपविण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करून सोमवार दिनांक 7 फेब्रुवारी रोजी राज्यात दुखवटा म्हणून सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.