Election 2022 – निवडणुका संपताच इंधनदरवाढीचा भडका उडणार ?

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . ८ फेब्रुवारी । आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाच्या किंमतींमध्ये बरीच वाढ झाली आहे. असं असलं तरी हिंदुस्थानात जवळपास 3 महिन्यांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत फारसा बदल झालेला नाहीये. मात्र ही स्थिती फार काळ राहणार नसून एकदा का 5 राज्यांतील विधानसभा निवडणुका पार पडल्या की इंधनाचे दर बेफाम वाढण्याची दाट शक्यता आहे. उत्तर प्रदेश, पंजाब, गोवासहीत 5 राज्यांमध्ये विधानसभेच्या निवडणुका होत असून या निवडणुकांनंतर इंधनाचे दर वाढण्याची शक्यता आहे.

सोमवारी आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाची किंमत 94 डॉलर प्रति बॅरल इतकी नोंदवण्यात आली होती. ओमायक्रॉनने जगभरात धुमाकूळ घालायला सुरुवात केल्यानंतरत जगभरात जे निर्बंध घालण्यात आले होते, त्यामुळे कच्च्या तेलाची किंमत घसरली होती. 1 डिसेंबरला कच्च्या तेलाची किंमत ही 69 डॉलर प्रति बॅरल इतकी झाली होती. 4 नोव्हेंबर उजाडेपर्यंत ती 81 डॉलर झाली होती आणि आता ती 94 डॉलरपर्यंत पोहोचली आहे. ओमायक्रॉनचं संकट हळूहळू कमी होत असतानाच रशिया आणि युक्रेनमध्ये युद्धसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे कच्च्या तेलाच्या किंमती वाढायला लागल्या आहेत.

आंतरराष्ट्रीय बाजारात 4 नोव्हेंबरपासून आतापर्यंत कच्च्या तेलाच्या किंमतीत 12 डॉलर्सची वाढ झाली आहे. मात्र हिंदुस्थानात या काळात पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत फार वाढ झालेली नाहीये. इंडिया रेटींग अँड रिसर्चचे मुख्य अर्थतज्ज्ञ सुनील कुमार सिन्हा यांनी या परिस्थितीबाबत बोलताना म्हटलंय की जर आंतरराष्ट्रीय पातळीवरील कच्चा तेलाच्या किंमती या स्तरावर कायम राहिल्या तर 5 राज्यांतील विधानसभा निवडणुकांनंतर देशवासीयांना मोठा धक्का सहन करण्याच्या तयारीत राहावे लागेल. सिन्हा यांनी म्हटलंय की या निवडणुकांनंतर इंधनाच्या दरात बेफाम वाढ करण्यात येईल. तोटा भरून काढण्यासाठी इंधनाच्या किंमती वाढवण्यात येतील. क्रिसिलचे मुख्य अर्थतज्ज्ञ डी.के.जोशी यांनी म्हटलंय की तेलाच्या वाढत्या किंमतींमुळे महागाईचा स्फोट होण्याची भीती असून याचा अर्थव्यवस्थेवरही विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे. नवभारत टाईम्स या हिंदी वर्तमानपत्राच्या संकेतस्थळावर याबाबतचे वृत्त प्रसिद्ध करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *